टी२० क्रिकेट मालिकेत इंग्लंडने शेवटच्या षटकात पाकिस्तानवर विजय मिळवला. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-०ची आघाडी घेतली. बाबर आझम, मोहम्मद हाफीज यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला २० षटकात १९६ धावांचे आव्हान दिले होते. इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड मलान यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या षटकात विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने कर्णधार बाबर आझमवर टीका केली.

१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझमने आक्रमक नेतृत्व करायला हवं होतं असं त्याने मत मांडलं. “बाबर आझम हा वाट हरवलेल्या गायीसारखा कर्णधारपद भूषवत होता. तो मैदानात तर होता, पण त्याला काहीही कळत नव्हतं. त्याने स्वत:हून काही निर्णय घेणे हे त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचे आहे. बाबर आझमला हे कळायला हवं की अशा संधी आयुष्यभर मिळत नाहीत. त्यामुळे त्या संधीचा नीट वापर करता यायला हवा”, असे अख्तर म्हणाला.

पाकिस्तानच्या संघावरही त्याने तोंडसुख घेतलं. “पाकिस्तानचा संघ जैव-सुरक्षित वातावरणात तर आहे, पण ते खेळाबाबत असुरक्षित आहेत असं वाटतं. संघनिवड, व्यवस्थापन, कर्णधारपद, सांघिक प्रयत्न साऱ्यातच एक प्रकारचा गोंधळ दिसून येतोय. कोणताही संघ अशाप्रकारे खेळ खेळण्यासाठी तयार केलेला नसतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी”, असे तो म्हणाला.