सध्या भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूच्या विळख्यात सापडलं आहे. जगभरात अनेक लोकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. या परिस्थितीत जगभरातील क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानातही करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. यामधून सावरण्यासाठी माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. शोएबच्या या पर्यायाला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी, निधीसाठी क्रिकेट खेळवण्याची गरज नाही, भारताकडे पैसा आहे…असं म्हणत विरोध दर्शवला होता.

आता या मुद्द्यावरुन दोन्ही माजी खेळाडूंमध्ये वाकयुद्ध सुरु झालेलं आहे. आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना शोएब अख्तरने कपिल देव यांना टोला लगावला आहे. “मला काय म्हणायचं आहे हे कपिल भाईंना समजलंच नाही. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता सर्व मुद्दे बाजूला ठेवून पैसा कसा निर्माण होऊल याचा विचार करणं गरजेचं आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी टिव्हीला चिकटून बसतील यात काहीच शंका नाही. कपिल भाईंनी म्हणलं की आम्हाला पैशाची गरज नाही, कदाचित त्यांना पैशांची गरज नसेल पण इतरांना ती नक्कीच आहे. माझ्या मते मी सुचवलेल्या पर्यायावर भविष्यात नक्कीच विचार होईल.”

मी भारतामध्ये अनेक शहरांमध्ये फिरलो आहे. पाकिस्तानात सध्या खूप गरिबी आहे, लोकांना त्रास होताना मी पाहतो आहे. एक माणूस आणि मुसलमान म्हणून इतरांना शक्य होईल तितकी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर ज्यांचं पोट अवलंबून आहेत असे अनेक लोकं आहेत. पुढील सहा महिन्यांत क्रिकेट खेळवलंच गेलं नाही तर त्या परिवारांचं काय होणार हे आपण सांगू शकतो का?? त्यामुळे सध्याच्या परिस्थिीती नियंत्रणात आल्यानंतर निधी उभा करण्यासाठी एक क्रिकेट मालिका खेळवावी असा माझा विचार होता. भविष्यात यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, असं शोएब म्हणाला.