झिम्बाब्वे येथे सुरु असलेली तिरंगी मालिका ही विक्रमांची मालिका ठरत आहे. या मालिकेच्या दरम्यान पहिल्याच सामन्यात आशिया खंडाला २००० धावा करणारा पहिला फलंदाज मिळाला होता. त्यानंतर आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटला १०० सामने खेळणारा पहिला फलंदाज मिळाला आहे.

झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिका सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने २००० धावा पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे टी२० क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणाराही शोएब मलिक हाच पहिला खेळाडू ठरला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून सहज जिंकला. या सामन्यात मलिकला फारशी कमाल करता आली नाही. त्याने १६ चेंडूत १३ धावा केल्या. मात्र त्याच्या माध्यमातून टी२० क्रिकेटला १०० सामने खेळणारा पहिला खेळाडू मिळाला. विशेष म्हणजे यासाठी १३ वर्षांचा कालावधी लागला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर हा १०० एकदिवसीय सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता. तर इंग्लंडचा कॉलिन काऊड्री हा १०० कसोटी सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला होता.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक याने संधीचा पुरेपूर फायदा उचलला. मलिकने झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात २४ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी करत २ हजार धावांचा पल्ला गाठला. ही कामगिरी करणारा शोएब मलिक पहिला आशियाई खेळाडू ठरला. ९९ सामन्यांपैकी ९२ डावांमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.