सध्या कॅनडामध्ये टी २० लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत युवराज सिंग, ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी यासारखे तडाखेबाज फलंदाज षटकारांवर षटकार मारत आपला जलवा दाखवत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यानेदेखील आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. शोएब मलिकने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. महत्वाचे म्हणजे निवृत्तीनंतर तो चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसत आहे. सध्या ग्लोबल टी २० लीग स्पर्धेत त्याने खेचलेल्या २ खास षटकारांमुळे तो चर्चेत आला आहे.

ब्राम्पटन येथील सीएए सेंटर मध्ये गुरूवारी झालेल्या सामन्यात शोएब मलिकने आपली चमक दाखवली. व्हॅनकुव्हर नाईट्स विरूद्ध ब्राम्पटन वुल्व्स या संघात टी २० सामना सुरू होता. हा सामना पात्रता फेरीतील पहिला सामना (Qualifier 1) होता. संघाचा कर्णधार शोएब मलिक आणि आंद्रे रसल हे दोघे व्हॅनकुव्हर नाईट्स संघाच्या गोलंदाजांना झोडपून काढत होते. न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोढी १३ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शोएब मलिकने ६८ मीटर लांब षटकार लगावला. त्यावेळी सीमारेषेबाहेरील काचेच्या केबिनवर चेंडू आदळून काच फुटली. त्यानंतर पुन्हा याच सामन्यात वहाब रियाझच्या चेंडूवर सारखाच प्रकार घडला. त्याने टोलवलेला चेंडू पुन्हा सीमारेषेवबाहेरील काचेच्या केबिनवर आदळून काच फुटली. सुदैवाने चाहत्यांना दुखापत झाली नाही.

दरम्यान, शोएब मलिकने २६ चेंडूत दमदार ४६ धावा केल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने संघाला १६ षटकात १७० धावांची विजयी धावसंख्या गाठून दिली.