पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंग्लंड दौऱ्यात केंटविरुद्ध सराव सामन्यादरम्यान हसन अलीने एका फलंदाजाला झेलबाद केलं. मात्र व्हिडीओमध्ये अलीने हा झेल सोडल्याचं दिसत आहे, त्यामुळे यावरुन पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १ टी-२० आणि ५ वन-डे सामने खेळणार आहेत.

केंटविरुद्ध सामन्यात ३० व्या षटकात अॅलेक्स ब्लेक नावाच्या फलंदाजाचा झेल घेण्यासाठी हसन अली पुढे सरसावला. मात्र व्हिडीओमध्ये अलीच्या हातातून हा चेंडू निसटल्याचं दिसत आहे. मात्र एवढं होऊनही अलीने विकेट घेतल्याच्या थाटात सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान पाकिस्तानने आपण झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन केल्याचं म्हटलं आहे तर केंटच्या संघाने हसन अलीने झेल सोडल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा फलंदाज बाद की नाबाद हे तुम्हीच ठरवा.

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूने फलंदाजाने हवेत टोलवलेल्या चेंडूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं की त्याला झेलबाद ठरवलं जातं. मात्र या बाबतीत हसन अलीच्या हातातून बॉल निसटताना दिसतो आहे. मात्र पंचांनी बाद ठरवल्यामुळे फलंदाजाने पॅव्हेलियनकडे परतणं पसंत केलं. या प्रकाराविरुद्ध नॉन-स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या ओ.जी.रॉबिन्सन याने पंचांजवळ आपली नाराजी व्यक्त केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याआधीही अली अशा प्रकारच्या वादग्रस्त निर्णयांसाठी चर्चेत राहिलेला आहे.