महिलांचा सामना कंटाळवाणा होतो, या टीकेला चोख उत्तर देताना दुबळ्या श्रीलंकेच्या संघाने गतविजेत्या इंग्लंडवर धक्कादायक विजयाची नोंद केली. दिलानी मनोदरा हिने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ इंग्लंडवर एक विकेट राखून सनसनाटी आणि आश्चर्यकारक विजयाची नोंद केली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुसऱ्या अत्यंत रोमहर्षक झालेल्या या लढतीत शेवटचे षटक नाटय़पूर्ण ठरले. विजयासाठी २३९ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना चामरी अट्टापटू (६२) व यशोदा मेंडीस (४६) यांनी लंकेच्या विजयाचा पाया रचला. मात्र मधल्या फळीतील पडझडीमुळे श्रीलंका पराभवाच्या छायेत सापडली होती. मधल्या फळीत एका बाजूने झुंज देणारी ईशाना कौसल्या हिने शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला, मात्र लगेचच ती धावचीत झाली. तिने पाच चौकार व तीन षटकारांसह ५६ धावा केल्या. शेवटचा चेंडू बाकी असताना श्रीलंकेला विजयासाठी एक धावेची गरज होती. दिलानी हिने जॉर्जिया एल्वीसच्या चेंडूवर षटकार ठोकून विजयश्री खेचून आणली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ८ बाद २३८ धावा केल्या. त्यामध्ये जेमी गन (५२), अ‍ॅमी जोन्स (४१) व हीदर नाइट (३१) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीचा मोठा वाटा होता.
संक्षिप्त निकाल
इंग्लंड : ५० षटकांत ८ बाद २३८ (जेमी गन ५२, अ‍ॅमी जोन्स ४१, हीदर नाइट ३१; ईशाना कौसल्या २/४९, चामानी सिरेवीररत्ना २/३५, शशिकला सिरीवर्धना २/६२) पराभूत वि. श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २४४ (चामरी अट्टापट्टू ६२, यशोदा मेंडीस ४६; कॅथरीन ब्रन्ट २/३६, जॉर्जिया एल्वीस २/३९, एरॉन ब्रिन्डल २/३८).