तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर रवीचंद्रन सिद्धार्थ याने हंगेरीचा ग्रँडमास्टर फोडोर तमास याचा तर सांगलीच्या समीर काठमाळेने भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर पी. कार्तिकेयन याचा पराभव करून धक्कादायक विजयाची नोंद केली. या विजयामुळे सहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत या दोघांनी अन्य सहा जणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. जॉर्जियाचे ग्रँडमास्टर महेदिश्विली मिखाइल आणि ग्रँडमास्टर पेन्टासुलैया लेवान यांनी आपला डाव बरोबरीत सोडवत ६.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. सिद्धार्थने फोडोरविरुद्ध स्लाव्ह बचावात्मक पद्धतीने डावाला सुरुवात केली. १७व्या चालीला त्याने घोडय़ाच्या साहाय्याने प्यादाचा बळी मिळवला. सिद्धार्थने हत्तीसह फोडोरच्या राजावर आक्रमण केले. त्यात फोडोरला उंट गमवावा लागल्यामुळे त्याला पराभव मान्य करावा लागला. समीरने कार्तिकेयनविरुद्ध २३व्या चालीला घोडय़ाचा बळी देण्याची चाल रचली. पण कार्तिकेयनने त्याचा घोडा मिळवण्याचे नाकारले. ३१व्या चालीत कार्तिकेयनला प्यादे गमवावे लागल्यामुळे ५३व्या चालीत त्याचा पराभव झाला. नवव्या फेरीच्या निकालावर समीरला आंतरराष्ट्रीय नॉर्म मिळण्याची संधी आहे.