भारताची दिग्गज नेमबाजपटू हीना सिधूने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणारी ती नववी नेमबाजपटू ठरली आहे. हीनाने संपूर्ण स्पध्रेत वर्चस्व गाजवताना ११९.४ गुणांची कमाई केली. चायनीस तैपेईच्या टिएन चिआ चेनने १९८.१ गुणांसह रौप्य आणि कोरियाच्या गिम यून मी हिने १७७.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
चुरशीच्या अंतिम फेरीत हीनाने शेवटून दुसऱ्या प्रयत्नात १०.३ गुणांची कमाई करून तैपेईच्या चेनपेक्षा अधिक १.५ गुणांची कमाई केली. अंतिम प्रयत्नात हीनाला १० गुण मिळाले, तर चेनला १०.२ गुण, परंतु सुरुवातीच्या आघाडीमुळे हीनाला विजय मिळवता आला. २६ वर्षीय हीनाने गेल्या वर्षी झालेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे आत्मविश्वासाने खेळ करत हीनाने ३८७ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
५० मीटर रायफल प्रोन आणि महिलांच्या ट्रॅप प्रकारात एकाही भारतीय नेमबाजपटूला पात्रता फेरीची वेस ओलांडता आली नाही. पुरुष रायफल प्रोन प्रकारात युवा स्वप्निल कुसळेला (६१७.२) १४ व्या, सुशील घाळेला १७ व्या आणि सुरेंद्र सिंग राठोडला २४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ट्रॅप प्रकारात ऑलिम्पिकमध्ये एकच कोटा शिल्लक होता. मात्र पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या श्रेयसी सिंगची ही संधी हुकली. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील पहिल्या फेरीत लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या विजय कुमारने (२८५) सातवे स्थान पटकावले. याव्यतिरिक्त नीरज कुमार आणि हरप्रीत सिंग यांनी अनुक्रमे १३ वे व १६ वे आणि महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात यशस्विनी देशवल आणि श्वेता सिंग यांनी अनुक्रमे ११वे व १२ वे स्थान पटकावले.
स्पध्रेतील सर्व प्रक्रियेवर मी लक्ष केंद्रित केले होते. चांगली कामगिरी करीत आहे, याची खात्री होती. त्यामुळे आज मी ऑलिम्पिक पात्रता मिळवणारच, असा आत्मविश्वास होता.
– हीना सिधू