ऑलिम्पिक पदकविजेता गगन नारंग, अंजली भागवत यांच्यासारखे जागतिक दर्जाचे नेमबाज घडवणारे प्रख्यात नेमबाजी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचे शनिवारी रात्री करोनाची लागण झाल्यामळे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

गेल्या चार दशकांच्या प्रशिक्षण कारकीर्दीत द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या चक्रवर्ती यांनी अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करीत नेमबाजी क्रीडा प्रकारात महत्त्वाचे कार्य केले. आंतरराष्ट्रीय नेमबाज जॉयदीप कर्माकर यांनी ‘ट्विटर’द्वारे चक्रवर्ती यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानंतर भारतीय रायफल संघटनेने त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली.

‘‘संजय सर म्हणून लोकप्रिय असलेल्या चक्रवर्ती यांचे नेमबाजीतील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी अनेक राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू घडवले आहेत. त्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या खेळाडूंची यादी बरीच मोठी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,’’ असे भारतीय रायफल संघटनेने शोकसंदेशात म्हटले.

‘‘संजय सरांसारखे खरेखुरे द्रोणाचार्य गमावल्याचे अतिशय दु:ख वाटते आहे. आधुनिक काळातील या द्रोणाचार्याने फक्त एक नव्हे, तर माझ्यासह अनेक अर्जुन घडवले आणि कधीच गुरुदक्षिणा मात्र मागितली नाही. भारतीय नेमबाजी क्षेत्राने एक समर्थ प्रशिक्षक गमावला आहे,’’ अशा शब्दांत भारताच्या कनिष्ठ संघाच्या प्रशिक्षक सुमा शिरूर यांनी श्रद्धांजली वाहिली.

नेमबाजीतील दीपस्तंभ हरपला!

अंजली भागवत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ५० मीटरचे नेमबाजी सराव केंद्रही त्या वेळी आमच्याकडे नव्हते. दोन-तीन खेळाडू एक रायफल वापरायचो. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो, तेव्हा त्या दर्जाचे मार्गदर्शन मिळत नव्हते. याशिवाय इंटरनेट, मोबाइलसुद्धा नव्हते. परंतु उपलब्ध साधनसामग्रींसह संजय सरांनी आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवली. त्यांची शिकवण तांत्रिक ज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी आमच्यात चांगला खेळाडू घडवण्यासाठी शिस्त, समर्पण यांचे धडे दिले. कारकीर्दीत झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही, असे ते नेहमी सांगायचे. खेळाशी खेळाडूचे नाते कसे असावे आणि खेळाडूची वागणूक कशी असावी, हे आमच्या पिढीमध्ये संजय सरांनीच रुजवले. हे आजच्या पिढीत क्वचितच आढळते.

दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात जी नेमबाजीची लाट उसळली, त्याचे सर्वस्वी श्रेय संजय सरांना जाते. हे त्यांचे योगदान नेमबाजी क्षेत्रात कधीच विसरता येणार नाही. माझ्यासह सुमा, दीपाली, अनुजा, लीना, राखी यांच्यासारखे अनेक दर्जेदार नेमबाज त्यांनी घडवले. इतकेच नव्हे, तर पुढील १० वर्षे आम्ही फक्त संजय सर आणि भीष्मराज बाम यांच्यामुळे नेमबाजीत टिकू शकलो. आम्हाला नेमबाजीत आज जी प्रतिष्ठा मिळते आहे, त्याबद्दल संजय सरांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.

संजय सर गेली दोन वर्षे आजारपणाशी झुंज देत होते. कर्करोगाशी त्यांचा सामना चालू असतानाच गेल्या काही दिवसांत झालेल्या करोनामुळे त्यांचे निधन झाले. सेनादलातील नोकरी आणि खेळाडू असल्यामुळे त्यांची तब्येत खंबीर होती. मात्र त्यांच्या निधनामुळे नेमबाजीचा आधारवड हरपला आहे.

(शब्दांकन : प्रशांत केणी)