News Flash

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांचे वर्चस्व!

एअर पिस्तूल सांघिक प्रकारात पुरुष, महिला गटात सुवर्णपदकाची कमाई

| March 22, 2021 12:13 am

एअर पिस्तूल सांघिक प्रकारात पुरुष, महिला गटात सुवर्णपदकाची कमाई

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुरुष आणि महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि श्री निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारताच्या महिला संघाने ज्युलिटा बोरेक, जोआना इवोना वावरझोनोवस्का आणि अग्निझेस्का कोरेजवो यांचा १६-८ असा पाडाव करत प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष संघाने डिन्ह थान्ह गुयेन, कोक कुआँग ट्रान आणि झुआन चुयेन फान यांचा समावेश असलेल्या व्हिएतनामवर अंतिम फेरीत १७-११ अशी सहज मात केली.

तत्पूर्वी, भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, दीपक कुमार आणि पंकज कुमार यांनी दमदार कामगिरी करत भारताला पुरुषांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले.

सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम सामन्यात या तिघांनी भारताला १४ गुण मिळवून दिले. मात्र अमेरिकेच्या लुकास कोझेनिएस्की, विलियम शानेर आणि टिमोथी शेरी यांनी १६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या तेयून नॅम, ब्योनगिल चू आणि जे सेऊंग चुंग आणि इराणच्या पौर्या नोरोझियान, होसेन बाघेरी आणि आमिर मोहम्मद नेकोनाम यांच्यात कांस्यपदकासाठी लढत झाली. त्यात इराणने बाजी मारली.

महिलांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात भारताच्या निशा कनवार, श्रियांका शादांगी आणि अपूर्वी चंडेला यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

भारताला ६२३.७ गुण मिळवता आले. पोलंडने ६२४.१ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. अमेरिकेने ६२७.३ गुणांसह सुवर्ण आणि डेन्मार्कने ६२५.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

गनेमत सेखॉनला स्किट प्रकारात कांस्यपदक

भारताची युवा नेमबाज गनेमत सेखॉन हिने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपले पहिले पदक प्राप्त केले. तिने महिलांच्या स्किट प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी असलेल्या २० वर्षीय गनेमत हिने ४० गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. याच गटात भारताच्या कार्तिकी सिंह शक्तावत हिला ३२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ग्रेट ब्रिटनच्या अम्बर हिल हिने कझाकस्तानच्या झोया क्राव्हचेंको हिच्यावर अंतिम फेरीत मात करत सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोना

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोनाची लागण झाल्याने नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील करोनाग्रस्तांची संख्या सहावर पोहोचली आहे. नियमानुसार, करोनाग्रस्त खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. ‘‘शनिवारी रात्री काही नेमबाजांचे करोना चाचणीचे अहवाल मिळाले, त्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या नेमबाजांची दर दिवशी चाचणी करण्यात येणार आहे,’’ असे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:13 am

Web Title: shooting world cup dominant india win both men s and women s 10m air pistol team gold medals zws 70
Next Stories
1 राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा :  भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपद
2 मातब्बरांना धक्के देत महाराष्ट्र जेतेपद जिंकेल!
3 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : सुवर्ण‘यशस्विनी’
Just Now!
X