भारताची पदकतालिकेत अभूतपूर्व अग्रस्थानी झेप

पीटीआय, रिओ दी जानिरो

युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार पुनरागमन करत आयएसएसएफ विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सांघिक मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने अभूतपूर्व अशी कामगिरी करत विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.

यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांनी याच गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके जिंकत अव्वल स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत अन्य कोणत्याही देशाला एकापेक्षा अधिक सुवर्णपदकाची कमाई करता आली नाही.

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अपूर्वी चंडेला हिने दीपक कुमारच्या साथीने खेळताना भारताला मिश्र एअर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक मिळवून दिले. अंजूम मुदगिल आणि दिव्यांश सिंग पनवार यांना या प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी भारताच्याच यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा या जोडीवर १७-१५ अशी सरशी साधली. मनू-सौरभ जोडी सुरुवातीला ३-९ अशा पिछाडीवर पडली होती. त्यानंतर त्यांनी ७-१३ आणि ९-१५ असे पुनरागमन केले. मग पुढील सर्व लढती जिंकून या दोघांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. या जोडीने पात्रता फेरीतही ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली होती.

तत्पूर्वी, अपूर्वी-दीपक जोडीने दिवसाच्या सुरुवातीलाच चीनच्या यँग कियान आणि यू हाओनान यांचा एकतर्फी अंतिम लढतीत १६-६ असा धुव्वा उडवत भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली होती. अंजूम-दिव्यांश जोडीने हंगेरीच्या इस्टझर मेसझारोस आणि पीटर सिदी यांचा १६-१० असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. भारताने या वर्षांतील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामध्ये १६ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदके मिळवली आहेत.

चारही विश्वचषक स्पर्धामध्ये सुवर्ण

मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी या वर्षांत झालेल्या चारही विश्वचषक नेमबाजी स्पर्धामध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. नवी दिल्ली येथे भारताच्या तीन सुवर्णपदकांमध्ये या जोडीने मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर बीजिंग आणि म्युनिच येथे सुवर्णपदक पटकावल्यानंतर मनू-सौरभ यांनी रिओ दी जानिरोमध्येही सुवर्णयश संपादन केले.

पदकतालिका

क्र.     देश              सुवर्ण   रौप्य   कांस्य     एकूण

१      भारत              ५       २            २             ९

२      चीन                १        २            ४             ७

३      क्रोएशिया        १         १             –            २

४      ग्रेट ब्रिटन       १          १             –            २

५      जर्मनी            १           १             –            २

५ इलाव्हेनिल वालारिव्हान, अभिषेक वर्मा, यशस्विनी देसवाल, मनू भाकर-सौरभ चौधरी, अपूर्वी चंडेला-दीपक कुमार यांनी भारताला सुवर्णपदके जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली.

३ भारताने या वर्षीच्या चारपैकी तीन विश्वचषक नेमबाजी स्पर्धामध्ये (नवी दिल्लीत दुसऱ्या स्थानी) पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

९ नऊ नेमबाजांनी भारताला आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्यात यशस्विनी देसवाल, अंजूम मुदगिल, अपूर्वी चंडेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, राही सरनोबत, दिव्यांश सिंह पनवार, मनू भाकर आणि संजीव राजपूतचा समावेश आहे.