24 November 2017

News Flash

शूट-आऊट अ‍ॅट वानखेडे..१९ बळींचे थरारनाटय़!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे कधीही काहीही होऊ शकते.. मुंबई आणि पंजाब यांच्यातील

प्रसाद लाड मुंबई | Updated: December 12, 2012 2:34 AM

* अंकित चव्हाण ९/२३
*   अंकित चव्हाणचे ९ बळी
*   पंजाबचा दुसऱ्या डावात ५९ धावांवर खुर्दा
*   रोहित शर्माचे द्विशतक
*   पंजाबची ३ गुणांनिशी सरशी
*   मुंबईचे एका गुणावर समाधान

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे कधीही काहीही होऊ शकते.. मुंबई आणि पंजाब यांच्यातील वानखेडेवरील रणजी सामन्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १९ विकेट्स गेल्या आणि चार दिवसीय सामन्याला ट्वेन्टी-२०ची रंजकता आणि रोमहर्षकता आली.. या साऱ्या नाटय़पूर्ण घटनांचा सूत्रधार ठरला तो अंकित चव्हाण. त्याने पंजाबच्या दुसऱ्या डावात फक्त २३ धावांत ९ बळी घेण्याची किमया साधली.. अंकितच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबचा डाव अवघ्या ५९ धावांत गुंडाळला. सामना जिंकण्यासाठी मुंबईपुढे १० षटकांत १५५ धावांचे जवळपास अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य ठेवण्यात आले, मुंबईच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. पण हा रोमहर्षक सामना अखेर अनिर्णीतच राहिला. पहिल्या डावाच्या जोरावर पंजाबने तीन गुण कमावले, तर मुंबईला एका गुणावर समाधान मानावे लागले.
चौथ्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात हिकेन शाह (५४) बाद झाला, त्यानंतर रोहितने द्विशतकाला गवसणी घातली खरी, पण त्यानंतर धावचीत होऊन त्याने आत्मघात करून घेतला. त्याने २४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर २०३ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यावर अभिषेक नायरचा (५१) अपवाद वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांची अवस्था पाच बळी मिळवणाऱ्या मनप्रीत गोणीने बिकट केली. त्यामुळे  मुंबईचा पहिला डाव ४८५ धावांवर संपुष्टात आला. ९५ धावांची आघाडी मिळवून पंजाबचा संघ फलंदाजीला आला, पण आपल्या अद्भुत, अचूक आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर अंकितने त्यांची पळती भुई थोडी अशीच अवस्था केली. अंकितच्या ९ बळींमुळे पंजाबचा दुसरा डाव २३.५ षटकांत ५६ धावांवर संपुष्टात आला.
मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या रोहितने ११ चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २८ धावांची खेळी साकारली. या वेळी पंजाबने ९ क्षेत्ररक्षक सीमारेषेवर लावत मुंबईचा धसका घेतला होता. पण रोहित बाद झाल्यावर मुंबईचा धावांचा ओघ आटला आणि सामना थांबवण्याचा निर्णय दोन्ही कर्णधारांनी घेतला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब : ५८० आणि २३.५ षटकांत सर्वबाद ५९ (करण गोयल २५; अंकित चव्हाण ९/२३)
मुंबई : १६०.५ षटकांत सर्वबाद ४८५ (रोहित शर्मा २०३; मनप्रीत गोणी ५/८७) आणि ६ षटकांत २ बाद ६१ (रोहित शर्मा २८).
निकाल : सामना अनिर्णीत.
गुण : पंजाब – ३; मुंबई – १.    

मुंबईच्या रणजी संघातून पोवारला डच्चू
मुंबई : चालू मोसमात फॉर्मात नसलेला मुंबईचा अनुभवी फिरकीपटू रमेश पोवार याला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी संघातून डच्चू देण्यात आला. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान राजकोट येथे हा सामना होणार असून या सामन्यासाठी पंधरा जणांच्या संभाव्य संघात युवा फिरकीपटू सागर गोरिवलेला स्थान देण्यात आले आहे, तर आविष्कार साळवीच्या जागी जावेद खानला संधी देण्यात आली आहे. मुंबईचा संघ : अजित आगरकर (कर्णधार), वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, हिकेन शाह, आदित्य तरे, इक्बाल अब्दुल्ला, जावेद खान, अंकित चव्हाण, शार्दुल ठाकूर आणि सागर गोरिवले.

महाराष्ट्राची तीन गुणांची कमाई
हरयाणाविरुद्धचा सामना अनिर्णीत
पुणे : पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर महाराष्ट्रने हरयाणाविरुद्धच्या अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात तीन गुणांची कमाई केली, तर हरयाणाला एका गुणावरच समाधान मानावे लागले. सामन्याच्या चौथ्या दिवशी सन्नी सिंगचे (५४) आणि अन्य फलंदाजांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर हरयाणाने संपूर्ण दिवस फलंदाजी करत दिवसअखेर ७ बाद २५५ अशी मजल मारली. महाराष्ट्रच्या समद फल्लाहने या वेळी तीन बळी मिळवले, तर श्रीकांत मुंडेने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

First Published on December 12, 2012 2:34 am

Web Title: shootout at wankhade 19 wickets terror drama