गोळाफेकीत १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला * लांब उडीत श्रद्धा घुलेचे सोनेरी यश
गोळाफेकपटू मनप्रीत कौरने राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पध्रेच्या पहिल्या दिवशी १८ वर्षांखालील राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले. ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या श्रद्धा घुलेने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले.
रेल्वेकडून खेळणाऱ्या मनप्रीतने १७.९६ मीटर लांब गोळा फेकून १९९७ मध्ये हरबन्स कौर यांनी नोंदविलेल्या १७.४३ मीटरच्या विक्रमाला पिछाडीवर टाकले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या १७.८० मीटर अंतर मनप्रीतने सहज पार केले. या कामगिरीबरोबच मनप्रीतने गेल्यावर्षी दिल्ली राष्ट्रीय स्पध्रेत नोंदविलेला १६.३९ मीटरचा स्वत:चा विक्रमही मोडला. मनप्रीतची राष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक असून तिचे हे एकूण सहावे सुवर्णपदक आहे.
रेल्वेचीच धावपटू ओ. पी. जैशाने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने हे अंतर १५ मिनिटे ३१.७३ सेकंदांत पार केले व २००७ मध्ये प्रिजा श्रीधरनने नोंदविलेला १५ मिनिटे ४५.९६ सेकंद हा विक्रम मोडला. एल. सूर्या या रेल्वेच्या खेळाडूने रौप्यपदक मिळविताना १५ मिनिटे ३१.७३ सेकंद अशी वेळ नोंदविली. रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची धावपटू स्वाती गाढवे हिला कांस्यपदक मिळाले. तिने हे अंतर १६ मिनिटे ११.६२ सेकंदांत पूर्ण केले.

’ श्रद्धाने महिलांच्या लांब उडीत ऑलिम्पिकपटू मायुखी जॉनीवर मात करीत आश्चर्याचा धक्का दिला. तिने ६.३८ मीटपर्यंत उडी मारली. मायुखीला (६.३४ मीटर) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रेल्वेची खेळाडू तांजिला खातुनने (६.२७ मीटर) कांस्यपदक पटकावले.
’ महिलांच्या हातोडाफेकीत रेल्वेच्या सरिता सिंहने सुवर्णपदक मिळविताना ५८.९७ मीटर अशी कामगिरी केली. सोनमकुमारी (आयुर्विमा मंडळ) व गुंजनकुमारी (रेल्वे) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई झाली.
’ पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याची शर्यत सेनादलाच्या जी. लक्ष्मणनने जिंकली. त्याने ही शर्यत १४ मिनिटे ०.७७ सेकंदात पार केले. सुरेशकुमार (ओएनजीसी) व खेताराम (सेनादल) हे अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले.

या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण करेन अशी खात्री होती. हे स्वप्न साकार झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे ध्येय आहे. त्यासाठी अथक मेहनत घेणार आहे. – मनप्रीत कौर