चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे मत

चेन्नई : खेळपट्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत फलंदाजांनी खेळणे आवश्यक होते. तसेच आमच्या फलंदाजांनी फटके लगावण्यासाठी चुकीच्या चेंडूंची निवड केल्याचे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सांगितले.

मुंबईविरुद्ध चेन्नईला केवळ १३१ धावा करता आल्या. त्याबद्दल धोनी म्हणाला, ‘‘गृहमैदानावर खेळताना आम्ही परिस्थितीचे आणि खेळपट्टीचे आकलन अधिक झटकन करणे आवश्यक होते. या खेळपट्टीवर आम्ही आतापर्यंत ६-७ सामने खेळलो आहोत. खेळपट्टीचा रागरंग ओळखून त्यानुसार फलंदाजी करणे अपेक्षित होते. आमच्या फलंदाजीत अधिक सुधारणा होण्याची गरज आहे, असे मला वाटते. आमच्याकडे सर्वोत्तम फलंदाज आहेत. मात्र, त्या फलंदाजांनी योग्य फटके मारले नाहीत. या फलंदाजांवर संघाची धुरा अवलंबून असून ते खूप अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक असून निदान पुढील सामन्यात तरी ते चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.’’

गोलंदाजीत काही बाबतीत कमनशिबी ठरल्याचे धोनीने सांगितले. ‘‘काही वेळा झेल सुटले, काही वेळा फलंदाज थोडक्यात बचावले, या सर्व बाबींत गोलंदाजांना साथ मिळाली नाही. त्यामुळेच १३० धावांचे लक्ष्य पुरेसे ठरले नाही. सुदैवाने आम्ही अव्वल दोनमध्ये असल्याने आम्हाला अंतिम फेरी गाठण्याची अजून एक संधी मिळणार आहे. त्यामुळे त्या सामन्यात अधिक जबाबदारीने खेळून अंतिम फेरी गाठण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,’’ असेही धोनीने सांगितले.

मुंबईविरुद्ध सुमार खेळ केला – फ्लेमिंग

मुंबई इंडियन्स संघाने चेपॉकच्या मंद खेळपट्टीशी आमच्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेत आम्हाला चकित केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध आम्ही सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मुंबईची स्तुती केली.

मुंबईने १३२ धावांचे आव्हान सहा गडी राखून आणि दीड षटक शिल्लक राखून पार केले. त्यावरून चेन्नईला घरच्या मैदानावरच धूळ चारण्याची करामत मुंबईने केली.

‘‘मुंबई इंडियन्सने आत्मविश्वासाने खेळ केला. त्यांनी आम्हाला सतत दबावाखाली ठेवले. चेपॉकच्या खेळपट्टीला पोषक असे अनेक खेळाडू मुंबईकडे होते. त्यामुळे योग्य संतुलन राखत आणि अत्यंत चांगल्या लयीत खेळत मुंबईने विजय मिळवला. अशा दमदार प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असताना मुंबईने बाजी मारली,’’ असे फ्लेमिंगने सांगितले.

काही आघाडय़ांवर चेन्नईला अजून दमदार कामगिरी करण्याची आवश्यकता असून त्यात पॉवर-प्लेमधील खेळातील धावगती वाढवण्यावर भर हे प्रमुख आव्हान असल्याचे सांगितले. ‘‘पॉवर-प्लेमध्ये चेन्नईची धावांची गती सर्वात कमी असते, हे प्रमुख आव्हान आमच्यासमोर आहे. अन्य संघांच्या तुलनेत आमची कामगिरी सातत्याने खालावलेली आहे. पहिल्या सहा षटकांमध्ये आमच्या फारशा धावा होत नाहीत. फलंदाजी करताना संघाची कामगिरी ही ६ ते २० या षटकांमध्ये सुधारते. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही प्रारंभी केवळ ७ इतकीच धावगती होती. ती नंतरच्या षटकांमध्ये १० पर्यंत वाढवली होती. मात्र, पॉवर-प्लेमध्ये मंद धावगती ही सातत्यपूर्ण समस्या आहे. पॉवर-प्लेमध्ये धावफलकावर किमान ४० किंवा त्याहून अधिक धावा लागणे आवश्यक आहे. प्रारंभी धावगती कमी राहिली तर मधल्या फळीवर धावगती वाढवण्याचा दबाव येतो. अशा परिस्थितीत संपूर्ण डाव १०० धावांच्या आतच कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधपणे खेळत १३-१४ व्या षटकात शंभरी गाठून मग अखेरच्या षटकांमध्ये १० पेक्षा अधिक सरासरीने धावा काढणे ही अधिक चांगली रणनीती ठरू शकते,’’ असेही फ्लेमिंगने सांगितले.