मुंबई कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पध्रेच्या अंतिम फेरीत श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संघाने सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमला मुलींमध्ये तर सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमने अमर हिंद मंडळ, दादर या संघाला मुलांमध्ये पराभूत करीत विजेतेपद पटकावले. आज झालेल्या चुरशीच्या मुलींच्या अंतिम फेरीच्या लढतीत गतविजेत्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीम या संघाला (६-२-५-३) असे ११ विरुद्ध ५ अशी ६ गुणांनी मात केली. या सामन्यात श्री समर्थतर्फे साजल पाटील हिने २:३० नाबाद, ४:१० नाबाद असे तगडे संरक्षण करीत ३ गडी बाद केले तर अनुष्का प्रभू हिने ३:३० मि. पळतीचा खेळ करीत ३ गडी बाद करीत अष्टपैलू खेळ केला तर मधुरा पालव हिने २ गडी बाद केले. मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमच्या संघाने दादरच्या अमर हिंद मंडळाचा (५-९-४-१) असा १० विरुद्ध ९ असा एक गुण व ६:२० मि. राखून विजय मिळवला. सरस्वतीतर्फे संदेश वाघमारे याने २:४०, २:२० नाबाद असे तगडे संरक्षण केले तर त्यांच्या सुशील दडिंबेकर याने १:३०, १:५० मि. पळतीचा खेळ करीत १ गडी मारला. समाधान गांगरकर याने १:५०, २:०० मि. असा खेळ केला तर श्रेयस राऊळ याने १:३० व २ गडी असा खेळ सादर केला.
मुलींमध्ये तृतीय स्थान मिळवताना अमर हिंद मंडळ, दादरने श्री स्पोर्ट्स क्लबवर मात केली तर मुलांमध्ये तृतीय स्थान मिळवताना ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या संघाने विद्यार्थी क्रीडा केंद्र, परळ या संघाला पराभूत केले.
स्पर्धेतील उत्कृष्ट पारितोषिके खालीलप्रमाणे : उत्कृष्ट संरक्षक :  संदेश वाघमारे (सरस्वती स्पो. क्लब),  सेजल यादव (सरस्वती स्पो. क्लब), उत्कृष्ट आक्रमक : केदार शिवलकर (अमर हिंद मंडळ), अनुष्का प्रभू (श्री समर्थ व्या. मंदिर), अष्टपैलू : श्रेयस राऊळ (सरस्वती स्पो. क्लब) साजल पाटील (श्री. समर्थ व्या. मंदिर).