बीसीसीआयने दाखल केलेल्या याचिकेनंतर केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने श्रीशांतवर घालण्यात आलेली आजन्म बंदी पुन्हा एकदा कायम केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केरळ उच्च न्यायालयानेच श्रीशांतवरची बंदी उठवली होती, पण या निर्णयाला बीसीसीआयने खंडपीठासमोर आव्हान दिलं असता न्यायालयाने श्रीशांतवर पुन्हा एकदा बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

मात्र कोर्टाच्या या निर्णयाने श्रीशांत चांगलाच दुखावला गेला असून, त्याने ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. हा न्यायालयाचा सर्वात दुर्दैवी निकाल असून, खऱ्या गुन्हेगारांना कधी शिक्षा मिळणार असा सवाल श्रीशांतने विचारला आहे? याचसोबत लोढा समितीने स्पॉट फिक्सिंगसाठी दोषी ठरवलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना एक न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय असाही सवाल श्रीशांतने विचारला आहे.

२०१३ साली आयपीएल हंगामात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि आणखी २ खेळाडूंना अटक केली होती. यानंतर बीसीसीआयने चौकशी समिती स्थापन करुन श्रीशांतवर आजन्म क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. मात्र यानंतर दोन वर्षांमध्येच दिल्लीच्या न्यायालयाने श्रीशांतची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. यानंतर श्रीशांत आपल्याला क्रिकेट खेळता यावं यासाठी बीसीसीआयशी कोर्टात लढतो आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.