श्रेयस अय्यरचा वेगवान द्विशतकी नजराणा

आदित्य तरेचे संयमी नाबाद शतक

वर्षभरापूर्वीच श्रेयस अय्यरने रणजी पदार्पण केले आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याआधी विविध वयोगटातील क्रिकेट खेळताना श्रेयसच्या फलंदाजीत ऐन बहरातला वीरेंद्र सेहवाग दिसतो, असे क्रिकेटवर्तुळात कौतुकाने म्हटले जायचे. ‘वीरू’ची कारकीर्द एकीकडे अस्ताच्या दिशेने वाटचाल करीत असताना नव्या वीरूचा उदय झाल्याची ग्वाही श्रेयसने वानखेडे स्टेडियमवर शानदार द्विशतक झळकावून दिली. प्रथम श्रेणीमधील चौथ्या आणि रणजीमधील तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान द्विशतक साकारणारा श्रेयस दुसरा मुंबईकर ठरला. मात्र दुर्दैवाने सेहवागच्या विक्रमाने त्याला हुलकावणी दिली. परंतु मुंबईने या आधुनिक वीरूच्या पराक्रमाच्या बळावर यंदाच्या हंगामातील पहिलावहिला ‘जय’ मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. दुसऱ्या दिवसअखेर मुंबईच्या धावफलकावर ६ बाद ४९५ धावा समाधानाने झळकत होत्या आणि ३४१ धावांची आघाडी जमा होती. श्रेयसने सुमारे पाच तास किल्ला लढवताना १७६ चेंडूंत २५ चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने आपली मॅरेथॉन खेळी साकारली. या व्यतिरिक्त मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने शतक आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावून श्रेयसला सुरेख साथ दिली.
पहिल्या दिवसाच्या २ बाद १०३ धावसंख्येवरून श्रेयस आणि सूर्यकुमार यांनी शुक्रवारी पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. श्रेयसने आपली आक्रमकता कायम राखत ९० चेंडूंत शतक साजरे केले. मग १३८ चेंडूंत दीडशे तर १७५ चेंडूंत द्विशतक पूर्ण केले. श्रेयस आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची (२९६ चेंडूंत) भक्कम भागीदारी उभारली. सरबजीत लड्डाने सूर्यकुमारला (७८) बाद करून ही जोडी फोडली. मग श्रेयसने आदित्य तरेसोबत चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. द्विशतकाकडे कूच करताना श्रेयसने युवराज सिंगच्या गोलंदाजीवर उत्तुंग मारलेला फटका ब्रेंडर सर्णच्या हातून निसटून सीमीरेषेपलीकडे गेला. मात्र पंचांनी षटकाराऐवजी चौकार दिला. पण पुढच्याच चेंडूवर श्रेयसने एकेरी धाव घेत द्विशतक गाठले. परंतु युवराजने याच षटकात श्रेयसचा महत्त्वाचा बळी मिळवून पंजाबला दिलासा दिला. मग तंबूकडे परतणाऱ्या श्रेयसला युवीने ‘छान खेळलास’ अशा शब्दांत शाबासकी दिली. त्यानंतर अखेरच्या दिर्घसत्रात आदित्यच्या संयमी खेळाची छाप पडली. त्याने १४० चेंडूंत १५ चौकारांसह नाबाद १११ धावांची आपली शतकी खेळी फुलवली. आदित्य आणि धवल कुलकर्णी (नाबाद ३०) यांनी सातव्या विकेटसाठी ७१ धावांची नाबाद भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक
पंजाब (पहिला डाव) : १५४
मुंबई (पहिला डाव) : ११२ षटकांत ६ बाद ४९५ (श्रेयस अय्यर २००, आदित्य तरे खेळत १११, सूर्यकुमार यादव ७८; ब्रेंडर सर्ण ३/८७)

आक्रमक खेळण्याचा कोणताही इरादा नव्हता. प्रत्येक सत्राचा विचार करून खेळत गेलो. अर्धशतक साकारल्यानंतर आत्मविश्वास वाढला. सूर्यकुमार यादवसोबतच्या द्विशतकी भागीदारीमुळे मोठी धावसंख्या उभारता आली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाचा मला फायदा झाला. गेल्या वर्षीचा फॉर्म यावर्षीही टिकवता आला, याचे समाधान मोठे आहे.
-श्रेयस अय्यर
भारतीय फलंदाजाचे प्रथम श्रेणीतील वेगवान द्विशतक
रवी शास्त्री १२३ चेंडू मुंबई वि. बडोदा, डिसेंबर १९८५, मुंबई
आर. के. बोराह १५६ चेंडू आसाम वि. बिहार, डिसेंबर १९९१, रांची
वीरेंद्र सेहवाग १६८ चेंडू भारत वि. श्रीलंका, डिसेंबर २००९, मुंबई
श्रेयस अय्यर ७५ चेंडू मुंबई वि. पंजाब, ऑक्टोबर २०१५, मुंबई