इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा मधळ्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर जायबंदी झाला. त्यामुळे तो उर्वरित मालिकेसह आयपीएलमधूनही बाहेर झाला आहे. श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन आहे, त्यामुळे आयपीएल सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोठा धक्का बसलाय. त्यामुळे आयपीएलमध्ये श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्लीचा कर्णधार कोण असेल याबाबत बरीच चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीच्या संघव्यवस्थापनाकडे कर्णधारपदासाठी अनेक पर्याय आहेत. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हे दिग्गज खेळाडू दिल्लीच्या संघात आहेत. दोघांकडे राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेवन पंजाबचं कर्णधारपद सांभाळण्याचा अनुभवही आहे. शिवाय अलिकडेच मुंबईला विजय हजारे ट्रॉफी जिंकवणारा पृथ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ हे दोघंही कर्णधारपद सांभाळू शकतात. तसेच, सलामीवीर शिखर धवनकडेही मोठा अनुभव आहे. पण, ‘इनसाइड स्पोर्ट’च्या रिपोर्टनुसार, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा नवीन कर्णधार बनण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीचा उपकर्णधार पंतकडे कर्णधारपदाची धुरा जाईल, असं सुत्रांनी सांगितलं. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि टीमचे प्रमोटर्स लवकरच याबाबतचा निर्णय घेतील. यंदा 9 एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास जेमतेम दिवस शिल्लक राहिल्याने लवकरच कर्णधारपदाबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 30 मे रोजी कोलकाता येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यर जायबंदी झाला. इंग्लंडच्या संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. खांद्यांच्या हाडाला झालेली दुखापत ठिक होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा वेळ लागतो. शिवाय सर्जरी झाली तर काही महिन्यांचा कालावधी लागतो. श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सर्जरी होणार असल्याचं समजतंय.