उदयोन्मुख खेळाडूंबाबत श्रेयस अय्यरची भावना

प्रत्येक खेळाडूला कारकीर्दीत भरारी घेण्यासाठी संघाकडून स्थैर्य आणि स्थानाविषयी सुरक्षितता मिळणे आवश्यक असते; परंतु संघातून वारंवार आत-बाहेर केल्यामुळे खेळाडूचा आत्मविश्वास ढासळू शकतो, अशा शब्दांत भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने युवा क्रिकेटपटूंबाबत चिंता प्रकट केली.

२४ वर्षीय अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सात वर्षांनंतर प्रथमच इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) बाद फेरी गाठली. वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यामुळे अय्यरची आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० चमूत निवड करण्यात आली आहे; परंतु चांगली कामगिरी करूनही संघात सातत्याने संधी न मिळाल्यामुळे अय्यर निराश झाला आहे.

‘‘एखाद्या खेळाडूमध्ये कौशल्य असेल, तर त्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी मिळणे आवश्यक आहे. जर एखाद्या मालिकेतील तीन सामन्यांसाठी खेळाडूला संधी देऊन पुढील दोन सामन्यांसाठी वगळले, तर खेळाडूच्या मनात स्वत:च्याच क्षमतेविषयी शंका उपस्थित होते. त्याशिवाय त्याचा आत्मविश्वासही ढासळू शकतो. जर तुम्ही खरेच कौशल्यवान फलंदाज अथवा गोलंदाज असाल तर, तुम्हाला किमान दोन ते तीन मालिका सलग खेळण्याची संधी नक्कीच मिळाली पाहिजे,’’ असे प्रत्येकी सहा एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या मुंबईकर अय्यर म्हणाला.

‘‘संघनिवड तुमच्या हाती नसते; परंतु खेळाडू म्हणून तुम्ही फक्त सातत्याने धावा करण्यावरच भर देऊ शकता. अशा वेळी तुमच्या संयमाचा खरा कस लागतो. त्यामुळे एकदा संधी मिळाली की तुम्ही मागे वळून न पाहता त्याचा पुरेपूर लाभ घ्यायला पाहिजे,’’ असेही अय्यरने सांगितले.