सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सुपर लिग प्रकारासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या फेरीसाठी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं असून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसून, त्याला नेमकी कशाप्रकारची दुखापत झाली आहे याबाबतची माहिती समजू शकली नाहीये.

८ मार्चपासून या स्पर्धेच्या सुपर लिग प्रकाराला सुरुवात होते आहे. मुंबईसमोर पहिलं आव्हान कर्नाटकच्या संघाच असून ९ मार्चला मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे. यानंतर ११ तारखेला मुंबई विदर्भाविरुद्ध आणि १२ तारखेला उत्तर प्रदेशविरुद्ध सामना खेळणार आहे. सुपर लिग प्रकारात १० संघांसाठी २ गट पाडण्यात आले असून, प्रत्येक संघाला दुसऱ्या गटातील संघाविरुद्ध सामना खेळायचा आहे. स्पर्धेअंती गुणतालिकेवर पहिला क्रमांक मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवेल.

सुपर लिग प्रकारासाठी असा असेल मुंबईचा संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, जय बिस्ता, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, तुषार देशपांडे, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शुभम रांजणे, आकाश पारकर, शम्स मुलानी, ध्रुमिल मतकर, रोस्टन डायस