श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली. मात्र सलामीसाठी १३७ धावांचा पाया रचला गेल्यानंतर अपेक्षेइतकी मोठी धावसंख्या रचण्यात त्यांना अपयश आले.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ओडिशाने केलेल्या ३११ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने पहिल्या डावात ३७१ धावांपर्यंत मजल गाठली. हर्षद खडीवाले (८३), चिराग खुराणा (५४) व केदार जाधव (४४)यांनी दमदार फलंदाजी करूनही एक वेळ ७ बाद २७४ धावा अशी महाराष्ट्राची स्थिती होती. साहजिकच महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आठव्या क्रमांकावर आलेल्या मुंढेने आक्रमक खेळ करीत नाबाद ८२ धावा केल्या व संघाला आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्राची घसरगुंडी थोपवताना मुंढेने चौफेर टोलेबाजी केली. त्याने केवळ ५३ चेंडूंमध्ये नाबाद ८२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने आठ चौकार व दोन षटकार ठोकले.