महाराष्ट्राची ओदिशावर आघाडी

श्रीकांत मुंडे याने घेतलेल्या सहा बळींमुळेच महाराष्ट्राने रणजी क्रिकेट सामन्यात ओदिशाविरुद्ध पहिल्या डावात २४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ओदिशाच्या गोविंद पोड्डोरने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली. दिवसअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३ बाद १५६ धावांची मजल मारली आहे.

महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या २८१ धावांना उत्तर देताना ओदिशाने ४ बाद १६७ या धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. पोड्डोर व प्रतीक दास या कालच्या नाबाद जोडीने पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली. ही जोडी खेळत असताना ओदिशाला पहिल्या डावातील आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पोड्डोर हा शतक पूर्ण झाल्यानंतर लगेच बाद झाला. त्यानंतर त्यांचे उर्वरित पाच गडी ५४ धावांत तंबूत परतले. दुसऱ्या डावात स्वप्निल गुगळेच्या शैलीदार अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने आश्वासक धावसंख्या रचली. दिवसअखेर त्यांनी १७० धावांची आघाडी मिळविली असून, सामन्याचा रविवारी शेवटचा दिवस आहे.

पोड्डोर व प्रतीक यांनी सकारात्मक खेळ करीत महाराष्ट्राच्या संमिश्र माऱ्यास तोंड दिले. ही जोडी खेळत असताना ओदिशाची बाजू भक्कम होती. मात्र पोड्डोर बाद झाल्यानंतर त्यांच्या डावास खिंडार पडले. पोड्डोरला अनुपम संकलेचाने बाद करीत महत्त्वाचा बळी घेतला. पोड्डोरने ३०० मिनिटांच्या खेळांत १४ चौकारांसह १०० धावा केल्या. प्रतीक याने ४ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर मुंडेने ओदिशाच्या डावाची घसरगुंडी उडविली. १०३.५ षटकांत ओदिशाचा डाव २६७ धावांवर आटोपला. मुंडेने केवळ ६२ धावांमध्ये सहा गडी बाद केले. संकलेचा याने ५८ धावांत २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

महाराष्ट्राने दुसऱ्या डावात हर्षद खडीवाले (२४) याची विकेट लवकर गमावली. मात्र गुगळे याने कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत ९२ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. त्याने नऊ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी करीत ७१ धावा टोलविल्या. मोटवानीने २३ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी केदार जाधव व अंकित बावणे हे अनुक्रमे १६ व १९ धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र २८१ व ५५ षटकांत ३ बाद १५६ (स्वप्निल गुगळे ७१, बसंत मोहंती २/३१) ओदिशा १०३.५ षटकांत सर्वबाद २६७ (गोविंद पोड्डोर १००, प्रतीक दास ६२, श्रीकांत मुंडे ६/६२, अनुपम संकलेचा २/५८)