युवा खेळाडू शुभमन गिलला चौथ्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळण्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना दिले आहेत. अखेरच्या दोन सामन्यात विराट कोहलीला आराम देण्यात आला असून रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘ पहिल्या तीन सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. अखेरच्या दोन सामन्यातही भारत विजय मिळवेल. ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडविरोधात मिळवलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. सलग दोन मालिका विजयामुळे मी आनंदात आहे.’

यावेळी विराट कोहलीने अप्रत्यक्षपणे शुभमन गिलला आपला पर्याय असल्याचे सांगितले. ‘ कोणीतरी तुमची जागा घेईलच, खेळांमध्ये हे चालतेच. शुभमन गिल प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याला नेट्समध्ये सराव करताना मी पाहिले आहे. शुभमनच्या फलंदाजीने मी प्रभावित झालो आहे. ज्यावेळी मी १९ वर्षाच्या होतो तेव्हा त्याच्या १० टक्केही फलंदाजी करू शकत नव्हतो.’

न्यूझीलंडसारख्या दर्जेदार संघाविरोधात खेळण्यासठी भरपूर आत्मविश्वासची गरज असते. बलाढ्य संघाविरोधात तीन सामने सामने जिंकले हे आपलं मोठं यश आहे. भारतीय संघाची गोलंदाजी पाहण्यासारखी होती. शामी आणि भूवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला सुरूवातीलाच धक्के दिले. हार्दिक पांड्यानेही आपली भूमिका चोख बजावली. हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे संघात समतोल राहतो. संघातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावत आहे आणि हे पाहून मी खूश आहे.

खेळाचा सन्मान केल्यास तुम्हाला त्याचे फळ मिळतेच. खेळाचा सन्मान करायलाच हवा. आयुष्यात घडलेल्या एखाद्या वाईट प्रसंगामुळे खचून न जाता त्यातून शिकायला हवं, असे विराट कोहली हार्दिक पांड्याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना म्हणाला. पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे संघ समतोल झाला. हार्दिकने गोलंदाजी करताना दोन बळी घेतले, तसेच क्षेत्ररक्षण करताना दोन महत्वाचे झेलही घेतले. तो चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येतोय.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

म्हणून भुभमन गिलला मिळू शकते संधी –
शुभमन गिलची फलंदाजीची शैली विराट कोहलीसारखीच आहे. विराटप्रमाणे तोही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शुभनमला टीम मॅनेजमेंट संधी देऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. अंडर-१९ विश्वचषक न्यूझीलंडमध्ये पार पडला होता. ज्यामध्ये शुभमनने पाच डावांत १२४ च्या सरासरीने एक शतक आणि तीन अर्धशतकासह ३७२ धावा काढल्या होत्या. शुभमनजवळ न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव असल्यामुळे अखेरच्या दोन सामन्यात त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकते.