मोहालीत सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान शुक्रवारी हायवोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पंजाबचा युवा फलंदाज शुभमन गिलने पंचांनी आपल्याला बाद दिल्याचा निर्णय न पटल्यामुळे थेट शिवीगाळ देत मैदान सोडण्यास नकार दिला. गिलच्या अनपेक्षित उद्रेकामुळे पंचांनीही आपला निर्णय बदलला, मात्र यानंतर प्रतिस्पर्धी दिल्लीच्या संघाने मैदान सोडत न खेळण्याचा निर्णय घेतला. या नाट्यमय घडामोडींमुळे काहीकाळ सामना थांबवावा लागला.

नाणेफेक जिंकत पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनवीर सिंह आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र सनवीर लवकर माघारी परतला. यानंतर गुरकिरत मानसोबत शुभमन गिलने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र १८ धावांवर असताना पंच पश्चिम पाठक यांनी गिल बाद असल्याचं जाहीर केलं.

पंचांचा हा निर्णय गिलला मान्य नव्हता, ज्यामुळे त्याने मैदानात सोडण्यास नकार देत पंचांना शिवीगाळ केली. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच्या पत्रकाराने ही बाब सोशल मीडियावर मांडली आहे. शुभमनचा आक्रमक पवित्रा पाहता पंचांनी आपला निर्णय बदलला, मात्र त्यानंतर नाराज झालेल्या दिल्लीच्या संघाने निषेध नोंदवत मैदान सोडलं. अखेरीस सामनाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. यानंतर शुभमन फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. आधीच्या धावसंख्येत ५ धावांची भर घालत गिल २३ धावा काढून माघारी परतला.

अवश्य वाचा – Ranji Trophy : पहिल्या डावात महाराष्ट्राची घसरगुंडी, ४४ धावांत संघ माघारी