भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

 

हेही वाचा – डॅशिंगच..! महेंद्रसिंह धोनीच्या ‘त्या’ फोटोमुळं सोशल मीडियावर उठलं रान!

सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर..

सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला.

बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनही उपांत्य फेरीत

भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती. आज शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक निश्चित करत उपांत्य फेरीत धडत दिली आहे.