गेल्या आठवडय़ात चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या सायना नेहवालने हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतही शानदार सुरुवात केली. सार्वकालिन महान खेळाडू लिन डॅनवर मात करत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या किदम्बी श्रीकांतनेही या स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीमुळे चीन सुपर सीरिज स्पर्धेतून माघार घेणाऱ्या युवा पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवातीसह पुनरागमन केले आहे. मात्र पारुपल्ली कश्यपला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.
या मोसमातील तिसरे जेतेपद पटकावून फॉर्मात आल्याचे दाखवून देणाऱ्या सायनाने मलेशियाच्या जेमी सुबंधी हिचा सहज पाडाव करून दुसऱ्या फेरीत मजल मारली. पहिल्या सेटमध्ये जेमीची झुंज सहन करावी लागली तरी सायनाने हा सामना २१-१७, २१-११ असा जिंकत आगेकूच केली.
सातव्या मानांकित सिंधूने थायलंडच्या ब्युसान ओंगब्युमरुनग्पनला २१-१५, १६-२१, २१-९ असे नमवले. सिंधूने पहिला गेम जिंकत आश्वासक सुरुवात केली मात्र दुसऱ्या गेममध्ये तिच्या खेळातली लय हरपली आणि ब्युसानने बरोबरी केली. तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये सिंधूने तडफेने खेळ करत ब्युसानला निष्प्रभ केले.
श्रीकांतने सातव्या मानांकित तैपेईच्या चोऊ तिआन चेनवर १८-२१, २२-२०, २१-१६ अशी मात केली. चीनमधील स्पर्धा जिंकल्यानंतर अवघ्या काही तासात पुन्हा कोर्टवर उतरलेल्या श्रीकांतच्या खेळात थकवा जाणवला आणि त्याने पहिला गेम गमावला. दुसऱ्या गेममध्ये अटीतटीच्या मुकाबल्यात श्रीकांतने बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये श्रीकांतने झंझावाती खेळासह सरशी साधली.
थायलंडच्या तेआनगेइस्क सेइनबुनसूकने पारुपल्ली कश्यपवर १६-२१, २१-१७, २१-१४ असा विजय मिळवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर कश्यपच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे.
पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरीत दाखल झालेल्या अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले. अव्वल मानांकित चीनच्या चेन लाँगने अजयचा २१-१३, २१-७ असा धुव्वा उडवला. जपानच्या शो सासाकीने आरएमव्ही गुरुसाईदत्तला २१-१५, १५-२१, २२-२० असे नमवले. पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेतीवान जोडीने मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीवर २१-१५, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत यिन लू लिम-ली मेंग यिअन जोडीने ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला १६-२१, २१-१४, २३-२१ असे नमवले.