भारताच्या अव्वल दर्जाच्या खेळाडू सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यात इंडिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी त्यांना चीनच्या खेळाडूंचा अडथळा पार करावा लागेल.
सिरी फोर्ट स्टेडियमवर १ ते ६ एप्रिलदरम्यान ही स्पर्धा होत आहे. अडीच लाख डॉलर्स पारितोषिकाच्या या स्पर्धेत सायनाला आठवे मानांकन मिळाले आहे. तिला पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या सिमोनी प्रुश हिच्याशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर तिची माजी विश्वविजेती व तृतीय मानांकित यिहान वाँग (चीन) हिच्याशी गाठ पडण्याची शक्यता आहे.
जागतिक क्रमवारीत नववे स्थान मिळालेली सिंधू हिला पहिल्याच फेरीत ऑल इंग्लंड विजेती शिक्सियन वाँगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सिंधूने यापूर्वी दोन वेळा शिक्सियन हिच्यावर मात केली आहे. जर हा सामना सिंधूने जिंकला तर तिला सायका ताकाहाशी (जपान) किंवा सुंग जेई हियान (दक्षिण कोरिया) यांच्यापैकी एका खेळाडूशी झुंज द्यावी लागेल.
पुरुष गटात किदम्बी श्रीकांतला पहिल्या लढतीत जपानच्या ताकुमा युएदा याच्याशी खेळावे लागणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या पी.कश्यप याला पहिल्या फेरीत सहाव्या मानांकित झेंगमिंग वाँग याचे आव्हान असणार आहे. एच.एस.प्रणॉयची पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित चेन लाँग (चीन) याच्याशी गाठ पडेल. आनंद पवारचा चौथ्या मानांकित जॉन जोर्गेन्सन याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.