दोन्ही संघांमध्ये नाव असल्यामुळे संभ्रमाची स्थिती

प्रो कबड्डी लीगचा सहावा हंगाम आपल्या दिमाखदार चढायांनी गाजवणाऱ्या सिद्धार्थ देसाईला आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी दोन संघांमध्ये स्थान देण्यात आल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वेच्या अंतिम १२ खेळाडूंमध्ये समाविष्ट असलेला हा कबड्डीपटू महाराष्ट्राच्या संभाव्य (३०) संघातसुद्धा सामील आहे.

यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये सिद्धार्थने २१८ गुण मिळवून सर्वाधिक चढाईपटूंच्या यादीत तिसरे स्थान मिळवले. त्याच्या आक्रमणाच्या बळावर यू मुंबाने बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. याच कामगिरीच्या बळावर रोहा येथे २८ जानेवारीपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पध्रेसाठी सिद्धार्थला महाराष्ट्राने संभाव्य चमूत स्थान दिले. महाराष्ट्राच्या प्राथमिक संघात प्रो कबड्डीमधील कामगिरीच्या बळावर १० जणांना स्थान देण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सिद्धार्थ रेल्वेच्या नोकरीत रुजू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या आंतररेल्वे निवड चाचणी स्पध्रेतसुद्धा तो सहभागी झाला होता. इतकेच नव्हे तर संघाला जेतेपद मिळवून देताना त्याने सर्वोत्तम चढाईपटूचे पारितोषिकही कमावले होते. याच कामगिरीच्या बळावर रेल्वेच्या संघातही त्याला स्थान मिळाले.

अलिबाग येथे महाराष्ट्राचे विशेष सराव शिबीर १३ जानेवारीपासून सुरू होणार होते. परंतु मुंबई उपनगरातील राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पध्रेमुळे या सराव शिबिराला उशिराने सुरुवात झाली. या शिबिरात सहभागी झालेल्या २७ जणांमध्ये सिद्धार्थचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्पर्धेच्या काही दिवस अगोदर महाराष्ट्राचा १२ खेळाडूंचा अंतिम संघ निश्चित होईल. परंतु १६ जानेवारीपासून मुंबईत रेल्वेच्या सराव शिबिरालाही प्रारंभ होत आहे. तिथे तो अंतिम संघात आहे. त्यामुळे सिद्धार्थ बुधवारपासून सुरू होणाऱ्या शिबिराला कशी हजेरी लावणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.