युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये अवघ्या १५ वर्षांच्या आकाश मलिकने तिरंदाजीत रौप्यपदक पटकावले. सामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलाने केलेली कामगिरी ही भारताची युवा ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.

अमेरिकेच्या ट्रेंटन कॉवेल्ससमवेत झालेल्या अंतिम सामन्यात आकाशला ०-६ असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आकाश आणि ट्रेंटनने या तीन सेटमध्ये १० गुणांचे समान चार नेम साधले. मात्र त्यानंतर आकाशचा  नेम दोन वेळा पूर्णपणे चुकला. त्या दोन प्रयत्नात त्याला केवळ सहा गुणच मिळू शकल्याने त्याच्या हातून सामना निसटला. पण सामना गमावला असला तरी तोपर्यंत आकाशने रौप्यपदकावर ठसा उमटवला होता. आकाशच्या या रौप्यपदकाने भारताची पदकसंख्या तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि एका कांस्यपदकासह १३पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी २०१४ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये अतुल वर्माने तिरंदाजीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.

क्रिकेटपासून तिरंदाजीपर्यंत

आकाशने अवघ्या सहा वर्षांपूर्वीच तिरंदाजीच्या सरावाला प्रारंभ केला होता. त्याआधी तो मित्रांसमवेत क्रिकेट खेळायचा. एके दिवशी त्याच्या मित्रांसह तो एका मैदानात गेला, तिथे काही जण धनुष्यबाणाने काही करत होते. त्याला वाटले ते शिकार करीत आहेत. त्या वेळी मनजित मलिक यांनी घेतलेल्या चाचणीत आकाशने चमक दाखवली. त्यामुळे या खेळात आपण काही काही करू शकतो, अशी जाणीव आकाशला झाली. त्यामुळे मग त्याने या खेळासाठी मेहनत घेण्यास प्रारंभ केला. त्याच्या पालकांना खेळ खेळणे पसंत नव्हते. आकाशने चांगले शिक्षण घेऊन कुणी मोठा शासकीय अधिकारी व्हावे, अशी इच्छा होती. मात्र, त्याला तिरंदाजीत सातत्याने यश मिळत गेले. एकापाठोपाठ एक  स्पर्धामध्ये पदके मिळत गेल्याने त्याच्या पालकांनीदेखील त्याला पाठिंबा देण्यास प्रारंभ केला.

मी वेगवान वाऱ्यातदेखील नेमबाजीचा सराव केला होता. मात्र इथे त्यापेक्षाही अधिक वेगाने वारे वाहात होते. त्यामुळे अंतिम फेरीत माझ्या अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाही. तसेच ट्रेंटनचा खेळ माझ्यापेक्षा अधिक सरस होता, हे मान्य करावे लागेल. यापुढे मला अधिक मेहनत घेऊन प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करायचा आहे. तसेच दोन वर्षांनी होणाऱ्या  २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवायची आहे.

आकाश मलिक, तिरंदाज