भारतीय क्रिकेटच्या अनेक ऐतिहासिक स्मृतींचे साक्षीदार असलेल्या ईडन गार्डन्ससाठी गुरुवारचा दिवस खऱ्या अर्थाने भावनिक होता. भारतीय क्रिकेट इतिहासात आपले एक संस्मरणीय स्थान जपणाऱ्या ईडन गार्डन्सवर १८ फेब्रुवारी १९८७ या दिवशी पहिला एकदिवसीय सामना झाला होता. त्या घटनेला २५ वष्रे झाल्याचे निमित्त साधून कोलकाता क्रिकेट संघटनेतर्फे (कॅब) भारत आणि पाकिस्तानच्या काही दिग्गज क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ‘कॅब’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या हस्ते या महान क्रिकेटपटूंना चांदीचे सन्मानचिन्ह, टाय, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मैदानावर गौरविण्यात आले. याचप्रमाणे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.
बिशनसिंग बेदी, मुश्ताक मोहम्मद, अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ, सादिक मोहम्मद, इन्तिख्वाब आलम, इम्तियाझ अहमद, दिलीप वेंगसरकर, अनिल कुंबळे, संदीप पाटील, रमीझ राजा, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, के. श्रीकांत, सुनील गावस्कर, कपिल देव, रवी शास्त्री, वसिम अक्रम, नवज्योतसिंग सिद्धू आणि सौरव गांगुली या खेळाडूंना या वेळी गौरविण्यात आले. त्याआधी या क्रिकेटपटूंनी खुल्या वाहनातून स्टेडियमला एक फेरी मारली. ‘बंगालचा महाराजा’ गांगुली सर्वात शेवटच्या वाहनात होता. क्रिकेटरसिकांनी त्यांना यथोचित मानवंदना दिली. लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात द्विशतक झळकावून मिळविलेला आश्चर्यकारक विजय असो किंवा श्रीकांतने या मैदानावरील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात झळकावलेले धडाकेबाज शतक असो.. हे ईडनवरील भूतकाळातील अनेक क्षण समोर तरळल्याने येथील क्रिकेटरसिकांसाठीही हा भावनिक प्रसंग होता.