पहिला सेट गमावल्यानंतर सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवीत गिलेस सिमोन या फ्रेंच खेळाडूने अग्रमानांकित मरीन चिलीच याला १-६, ६-३, ६-२ असे हरविले आणि महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्य फेरीबाबत कमालीची उत्कंठा होती. सिमोन व चिलीच यांच्यातील सामना दोन तास रंगतदार झाला. पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित चिलीच याने ५-० अशी आघाडी घेतली होती. त्याने फोरहँडचे ताकदवान फटके, व्हॉलीज असा बहारदार खेळ केला. हा सेट त्याने ६-१ असा एकतर्फी जिंकून झकास सुरुवात केली. त्या वेळी हा सामना तो सहज घेणार असे वाटले होते. दुसऱ्या सेटपासून सिमोन याला सूर गवसला. त्याने बॅकहँडचे आक्रमक फटके, बेसलाइनवरून परतीचे फटके तसेच नेटजवळून प्लेसिंग असा चतुरस्र खेळ केला. त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक घेत ४-० अशी आघाडी मिळविली. तेथून सामन्यावर नियंत्रण घेत त्याने हा सेट घेतला व सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

बरोबरीमुळे तिसऱ्या सेटबाबत उत्सुकता निर्माण झाली. आत्मविश्वास उंचावलेल्या सिमोन याने या सेटमध्येही आक्रमक खेळ केला. त्याने परतीच्या फटक्यांबाबत दाखविलेले चापल्य अतुलनीय होते. चिलीच याला सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. दोन वेळा त्याची सव्‍‌र्हिसब्रेक झाली. सिमोन याने हा सेट घेत अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.