रिओसह ब्राझीलमध्ये प्रादुर्भाव झालेल्या ‘झिका’ विषाणूच्या भीतीमुळे टेनिसपटू मिलोश रौनिच आणि सिमोन हालेप यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत रौनिचने १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या रॉजर फेडररला उपांत्य फेरीत नमवले होते. मात्र अंतिम फेरीत अँडी मरेने त्याचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. उंचपुरा आणि तडाखेबंद सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध रौनिच कॅनडासाठी टेनिस पदक मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र झिका विषाणूसाठी आरोग्याबाबत धोका पत्करू शकत नाही असे रौनिचने म्हटले आहे. कुटुंबीय आणि प्रशिक्षकांशी सविस्तर चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे अतिशय कठीण होते. क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेत कॅनडाचे प्रतिनिधित्व करायला मिळणार नसल्याचे दु:ख आहे असे रौनिचने म्हटले आहे.

रौनिचप्रमाणे महिला टेनिसपटू सिमोन हालेपने फेसबुकच्या माध्यमातून ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. कारकीर्दीत वाटचाल कठीण होईल असा धोका पत्करू शकत नाही, असे हालेपने म्हटले आहे.

जॉन इस्नर, डॉमिनिक थिइम, बरनार्ड टॉमिक, निक कुर्यिगास यांच्यासह फेलिसिआनो लोपेझ यांनी विविध कारणांस्तव ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. फ्रान्सेका शियोव्हेन, मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अझारेन्काही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नसल्याने टेनिस स्पर्धाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स हे दिग्गज ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.

रिओ ऑलिम्पिक म्हणजे टेनिस पर्यटन असल्याचे उद्गार इर्नेस्ट गुल्बिसने काढले होते.  अव्वल मानांकित खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे गुल्बिसने केलेले वर्णन खरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.