सोमवारी सेरेनाशी सामना ; पुरुष गटात अलेक्झांडर झ्वेरेव्ह, नोव्हाक जोकोव्हिच, केई निशिकोरीची आगेकूच

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रोमानियाच्या सिमोना हॅलेपने शनिवारी व्हीनस विल्यम्सवर मात करीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या गटात अलेक्झांडर झ्वेरेव्ह, नोव्हाक जोकोव्हिच आणि केई निशिकोरी यांनी आगेकूच केली आहे.

हॅलेपने व्हीनसला ६-२, ६-३ असे सहज पराभूत केले. आता उपउपांत्यपूर्व फेरीत हॅलेपचा सामना विल्यम्स भगिनींपैकी लहान पण खेळामध्ये सर्वकालीन महानमध्ये गणल्या जाणाऱ्या सेरेना विल्यम्सशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत हॅलेप म्हणाली की, ‘‘माझ्याकडे सध्या तरी गमावण्यासारखे काहीच नसल्याने मी सर्वस्व पणाला लावून खेळेन. सेरेना ही महान टेनिसपटू असल्याने तिच्याविरुद्धचा सामना हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. मात्र त्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मी सज्ज आहे.’’

ओसाकाची विजयासाठी झुंज

जपानची नाओमी ओसाका आणि सहावी मानांकित एलिना स्वितोलिना यांना उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी पहिल्या गेममधील पराभवामुळे तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. ओसाकाने तैवानच्या सीह सु वेईविरुद्ध ७-५, ४-६, ६-१ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. सहाव्या मानांकित एलिना स्वितोलिनाला चीनच्या झॅंगकडून पहिल्याच गेममध्ये धक्का बसला. मात्र, त्यानंतर स्वितोलिनाने पुढील दोन्ही गेम जिंकत सामना ४-६, ६-४, ७-५ असा खिशात घातला.

सेरेनाकडून डायनाचे सांत्वन

२३ ग्रँडस्लॅम नावावर असलेली सेरेना विल्यम्स पुन्हा पूर्ण बहरात खेळत असल्याचे दिसत आहे. युक्रेनच्या डायना यासत्रेमस्काला सेरेनाने ६-२, ६-१ असे पराभूत केले. त्यामुळे डायनाला अक्षरश: कोर्टवरच रडू कोसळले. सेरेनाने कोर्टवरच ती चांगली खेळल्याचे सांगत डायनाचे सांत्वन केले. मी दमदार खेळ करण्यासाठीच इथे आले असून ही सुरुवात असल्याचेही सेरेनाने नमूद केले. दुसरीकडे रशियाच्या मारिया शारापोव्हाने हॅरियट डार्टवर ६-०, ६-० असा दणदणीत विजय मिळवला. मात्र हॅरियटचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, असे मारियाने सांगितले.

झ्वेरेव्हची आगेकूच

जर्मनीचा प्रतिभावान टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्हने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स बोल्टला ६-३, ६-३, ६-२ असे सहज पराभूत करीत प्रथमच ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जपानच्या केई निशिकोरी याने जोआओ साओसावर ७-६, ६-१, ६-२ अशी मात केली. नोव्हाक जोकोव्हिचने डेनिस श्ॉपोवॅलोव्हवर ६-३, ६-४, ४-६, ६-० असा विजय मिळवला.