भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिलांच्या एकेरीत आगेकूच केली आहे. मात्र अरुंधती पानतावणे, बी. साईप्रणीत आणि एच.एस.प्रणय यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
सिंधू या आठव्या मानांकित खेळाडूने जपानच्या युई हाशिमोतो हिच्यावर २१-१६, २१-१६ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. तिने ड्रॉप शॉट्सचा बहारदार खेळ केला तसेच तिने कॉर्नरजवळ सुरेख प्लेसिंग केले. अग्रमानांकित सायना नेहवाल हिचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे सिंधू हिच्या कामगिरीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सिंधूची सहकारी अरुंधती पानतावणे या महाराष्ट्राच्या खेळाडूला थायलंडच्या राचानोक इन्तानोन हिच्या वेगवान खेळापुढे पराभव स्वीकारावा लागला. चुरशीने झालेला हा सामना इन्तानोन हिने १४-२१, २१-७, २१-१६ असा जिंकला. अरुंधती हिने पहिला गेम जिंकला व तिसऱ्या गेममध्ये तिने चांगली झुंज दिली. या दोन्ही गेम्समध्ये तिने परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला. मात्र शेवटच्या गेममध्ये निर्णायक क्षणी तिने केलेल्या चुका इन्तानोनच्या पथ्यावर पडल्या. पुरुषांच्या एकेरीत प्रणय याला मलेशियाच्या चोंग वेई ली याच्याविरुद्ध आव्हान टिकविता आले नाही. अग्रमानांकित चोंग याने हा सामना २१-१४, २१-१९ असा जिंकला. सहाव्या मानांकित केनिची तागो याने साईप्रणीत याला रंगतदार लढतीनंतर पराभूत केले. शेवटपर्यंत रोमहर्षक ठरलेला हा सामना २१-१७, १९-२१, २१-११ असा जिंकला.