पी. व्ही. सिंधू आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीनेही शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली, मात्र पारुपल्ली कश्यपला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
नुकत्याच झालेल्या सिंगापूर सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. मात्र या पराभवातून बोध घेत सिंधूने या स्पर्धेत दमदार वाटचाल केली आहे. गुरुवारी सिंधूने जपानच्या हिरोसे इरिकोवर १४-२१, २१-१३, २१-१९ असा विजय मिळवला. याआधी या दोघींमध्ये झालेल्या तीन मुकाबल्यात इरिकोने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. यावेळी नवा इतिहास घडवत सिंधूने बाजी मारली. एक तास आणि १३ मिनिटांच्या लढतीत पहिल्या गेममध्ये इरिकोने झंझावाती खेळ करत सरशी साधली. मात्र त्यानंतर सिंधूने प्रदीर्घ रॅलींवर भर देत इरिकोला पिछाडीवर टाकले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने स्मॅशेस तसेच नेटजवळून सुरेख खेळ करत संस्मरणीय विजयाची नोंद केली. पुढच्या लढतीत सिंधूची लढत थायलंडच्या ब्युसानन ओंन्गब्युमरनग्पनशी होणार आहे.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानी असलेल्या गुरुसाईदत्तने तैपेईच्या वांग त्झू वेईवर १७-२१, २१-१३, २१-१९ अशी मात केली. पुढच्या फेरीत त्याचा मुकाबला चीनच्या लियू केइशी होणार आहे. पारुपल्ली कश्यपला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. तैपेईच्या ह्स्यू जेन हाओने कश्यपला २५-२३, २१-१७ असे नमवले. दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या अरुनकेसॉर्न डय़ुआनगाँग-वोराविचीलचैलकुल कुंचला जोडीवर २१-११, २१-१८ अशी मात केली.