कॅवलून (हाँगकाँग) : हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पी. व्ही. सिंधूवर भारताच्या आव्हानाची धुरा असणार आहे.

मागील वर्षी सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अग्रस्थानावर असणाऱ्या ताय झू यिंगकडून अंतिम फेरीत तिला संघर्षपूर्ण पराभव पत्करावा लागला होता.

यंदाच्या हंगामात सिंधूला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवता आले आहे. याशिवाय इंडिया आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

सिंधूची सलामीची लढत थायलंडच्या नितचाओन जिंदापोलशी होणार आहे. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिची चीनच्या ह बिंगजियाओशी गाठ पडेल. बिंगजियाओने सिंधूचा तीनदा पराभव केला आहे.

राष्ट्रकुलमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण आणि आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सायना नेहवालसाठी वाटचाल आव्हानात्मक असणार आहे. कारण दुसऱ्याच फेरीत तिला जपानच्या द्वितीय मानांकित अकानी यामागुचीशी भिडावे लागणार आहे.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतची पहिली लढत हाँगकाँगच्या वाँग विंग कि व्हिन्सेंटशी होणार आहे, मात्र दुसऱ्या फेरीत एच. एस. प्रणॉयशी सामना होण्याची दाट शक्यता आहे. प्रणॉयची सलामी डेन्मार्कच्या आंद्रेस अँटोनसीनशी होणार आहे. यंदाच्या हंगामात स्विस आणि हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या समीर वर्माची पहिल्या फेरीत थायलंडच्या सुप्पानयू अ‍ॅव्हिंगसॅनसनशी गाठ पडणार आहे. बी. साईप्रणितचा पहिला सामना थायलंडच्या खोसिट फेटप्रदाबशी होईल.