नवख्या पाय यू पो हिच्याकडून पराभवाचा धक्का; सात्त्विक-चिराग यांची विजयी सुरुवात

चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक सुवर्णपदक विजेती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला बुधवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या चायनीज तैपईच्या पाय यू पो हिने सिंधूला सलामीच्याच सामन्यात धूळ चारली. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्त्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी मात्र पुढील फेरीत आगेकूच केली.

एक तास आणि १४ मिनिटे रंगलेल्या महिला एकेरीच्या या सामन्यात पाय हिने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला २१-१३, १८-२१, २१-१९ असे तीन गेममध्ये पराभूत केले. या पराभवामुळे सिंधू आणि पाय यांच्यातील लढतींची आकडेवारी आता ३-१ अशी झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात जगज्जेतेपद मिळवल्यापासून २४ वर्षीय सिंधूची कामगिरी ढेपाळली आहे. कोरिया, डेन्मार्क या स्पर्धामध्ये सिंधूला उपांत्यपूर्व फेरी गाठणेही जमले नाही. तर गेल्या आठवडय़ात झालेल्या फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत ताय झू यिंगविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात २८ वर्षीय पायने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये १२-८ अशी आघाडी मिळवली. तिने स्मॅश आणि नेटजवळच्या फटक्यांचा योग्य वापर केला. पायकडे २०-८ अशी आघाडी असताना सिंधूने पटापट गुण मिळवून १७-२० अशी गुणसंख्या केली. परंतु अखेरीस पायने आवश्यक एक गुण मिळवून पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने मध्यंतराला ११-७ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर २१-१८ अशा फरकाने गेम जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पायने मात्र झुंजार खेळ करून सिंधूला निष्प्रभ केले. मध्यंतराला तिने ११-३ अशी आघाडी घेतली, परंतु सिंधूनेही हार न मानता तिची आघाडी १५-१२ अशी कमी केली. त्यानंतर सिंधूने सलग सहा गुण मिळवून १८-१५ अशी गुणसंख्या केल्याने पायवरील दडपण वाढले. मात्र पायने सलग चार गुण मिळवले आणि त्यानंतर सिंधूला पुन्हा डोके वर काढू देण्याची संधी न देता २१-१९ अशा अवघ्या दोन गुणांच्या फरकाने गेम जिंकून सामन्यावरही कब्जा केला.

सात्त्विक-अश्विनी यांची आगेकूच

मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळणाऱ्या सात्त्विकने कॅनडाच्या जोशुआ हुबार्ट आणि जोसेफिन वू यांच्यावर २१-१९, २१-१९ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्यांच्यासमोर पाचव्या मानांकित सीओ संग आणि चेई जंग यांचे आव्हान असणार आहे. मात्र महिला दुहेरीत अश्विनी आणि एन सिक्की रेड्डी यांना चीनच्या वेन मेई आणि झेंग यू यांच्याकडून अवघ्या ३० मिनिटांत ९-२१, ८-२१ अशा एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

एस. एस. प्रणॉयला पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. डेन्मार्कच्या रास्मस जेमकेने प्रणॉयवर २१-१७, २१-१८ अशी मात केली. त्यामुळे आता बी साईप्रणीत, पारुपल्ली कश्यप आणि समीर वर्मा यांच्यावर भारताची भिस्त आहे.

सात्त्विक-चिराग यांची विजयी सलामी

गेल्या आठवडय़ात झालेल्या फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या पहिल्या लढतीत अमेरिकेच्या फिलिप च्यू आणि रायन च्यू यांना २१-९, २१-१५ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. दुसऱ्या फेरीत त्यांचा जपानच्या सहाव्या मानांकित हिरोयूकी इंडो आणि युटा वाटांबे यांच्याशी सामना होईल.