ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावर पुन्हा मुसंडी मारली आहे.

सध्या पॅरिसमध्ये फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत खेळत असलेल्या सिंधूने एका स्थानाने आगेकूच केली आहे. चायनीज तैपेईची ताय झू यिंग अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सिंधूने एका आठवडय़ाकरिता जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर तिची घसरण झाली होती. मग सप्टेंबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पुन्हा हे स्थान मिळवले होते. मग ती तिसऱ्या स्थानावर होती.

गेल्या आठवडय़ात डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पध्रेची अंतिम फेरी गाठणाऱ्या सायना नेहवालने एका स्थानाने आगेकूच केली असून, ती आता जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

पुरुष एकेरीच्या क्रमवारीत किदम्बी श्रीकांतने आपले सहावे स्थान कायम राखले आहे, तर समीर वर्माने पाच स्थानांनी आगेकूच करताना १८वे स्थान गाठले आहे. डेन्मार्क आणि फ्रेंच खुल्या स्पध्रेतून माघार घेणाऱ्या एच. एस. प्रणॉयची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो १७व्या स्थानावर आहे. बी. साईप्रणीत २६व्या स्थानावर असून, सौरभ वर्माने दोन स्थानांनी आगेकूच करताना ४८वे स्थान गाठले आहे.