थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूचे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. याचप्रमाणे समीर वर्माचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. परंतु सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीने मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने आणि पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीच्या साथीने उपांत्य फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला रॅटचानोक इन्थॅनोनविरुद्ध खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे रॅटचानोकने २१-१३, २१-९ अशा फरकाने हा सामना जिंकला. मागील तिन्ही लढतींमध्ये सिंधूकडून पराभूत झालेल्या रॅटचानोकने सकारात्मक खेळाचे प्रदर्शन केले. पुरुष एकेरीत समीरने मात्र जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील डेन्मार्कच्या अँडर्स अ‍ॅन्टोनसेनला झुंजवले. परंतु अखेरीस मॅच पॉइंट वाया घालवल्याने अँडर्सने हा सामना २१-१३, १९-२१, २२-२० असा जिंकला. सिंधू आणि सायनाच्या पराभवांमुळे एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. अनुभवी सायनाला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

मिश्र दुहेरीत बिगरमानांकित सात्त्विक-अश्विनी जोडीने पाचव्या मानांकित तसेच जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या पेंग सून चॅन आणि लिऊ यिंग गोह जोडीचा १८-२१, २४-२२, २२-२० असा संघर्षपूर्ण पराभव केला. हा सामना एक तास आणि १५ मिनिटे चालला. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावरील सात्त्विक-अश्विनी जोडी उपांत्य फेरीत थायलंडच्या अग्रमानांकित देशापोल पुआव्हरानुक्रो आणि सॅपसिरी टॅराटॅनाशाय जोडीशी सामना करणार आहे.

पुरुष दुहेरीत सात्त्विक आणि चिराग जोडीने ३७ मिनिटांत मलेशियाच्या ओंग येव सिन आणि टेओ ई यि जोडीचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला.