News Flash

सिंधू, श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक

पुरुषांच्या एकेरीमध्ये ह्युआंगकडून अपेक्षित प्रतिकार न झाल्यामुळे श्रीकांतने पहिला गेम सहज जिंकला.

| January 23, 2016 04:17 am

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी एक लाख २० हजार अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे.

तिसऱ्या मानांकित सिंधूची इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेट्रीविरुद्ध या सामन्याआधी ७-२ अशी विजयाची कामगिरी होती. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हाच रुबाब टिकवत सिंधूने फॅनेट्रीला २१-१०, २१-१० अशा फरकाने पराभूत केले.

दोन वेळा विश्व अजिंक्यपद स्पध्रेचे कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूची स्पाइस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पध्रेत अव्वल मानांकित संग जि ह्यून (कोरिया) किंवा पाचव्या मानांकित सयाका साटो (जपान) यांच्याशी गाठ पडणार आहे.

दुसऱ्या मानांकित श्रीकांतने ३३ मिनिटे रंगलेल्या लढतीत चीनच्या ह्युआंग युशियांगचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतची शनिवारी मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनशी गाठ पडणार आहे. श्रीकांतने गेल्या वर्षी सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेत झैनुद्दीनला हरवले होते.

गेल्या वर्षी मकाऊ खुल्या स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ५-१ अशी आघाडी घेतली, मात्र फॅनेट्रीने तिला ७-७ असे गाठले. मात्र त्यानंतर सिंधूने आरामात पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत वर्चस्व मिळवले.

पुरुषांच्या एकेरीमध्ये ह्युआंगकडून अपेक्षित प्रतिकार न झाल्यामुळे श्रीकांतने पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ह्युआंगने प्रारंभी ८-४ अशी आघाडी घेतली. मग श्रीकांतने झपाटय़ाने गुण घेत आपली आघाडी १५-१४ अशी वाढवली. मग मात्र श्रीकांतने त्याला डोके वर काढण्याची संधी दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:04 am

Web Title: sindhu srikanth enter malaysia masters semi finals
टॅग : Sindhu
Next Stories
1 ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळाची परीभाषा बदलली- सचिन
2 कर्णधारपदासाठी धोनीच योग्य -हसी
3 होऊ दे आवाज.. ‘कबड्डी, कबड्डी’!
Just Now!
X