उबेर चषकामधील दमवणाऱ्या अभियानानंतर आता भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने काही काळ विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पात्रता फेरीने सुरू होणाऱ्या अडीच लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या जपान खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत भारताच्या आव्हानाची धुरा पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांच्यावर असेल.
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाने नवी दिल्लीमध्ये झालेल्या उबेर चषक स्पध्रेत भारताला कांस्यपदक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु चालू महिन्याच्या अखेरीस इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियातील स्पध्रेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सायनाने जपान खुल्या स्पध्रेतून माघार घेण्याचे ठरवले आहे.
सायनाच्या अनुपस्थितीत सिंधू आणि युवा तन्वी लाड यांच्यावर महिला एकेरीत भारताची मदार असेल, तर पुरुष एकेरीत भारताचे आव्हान श्रीकांतच्या कामगिरीवर अवलंबून असेल. उबेर चषकात सिंधूनेही धडाकेबाज कामगिरीचे प्रदर्शन करीत सर्वच एकेरीच्या लढती जिंकल्या होत्या. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेली सिंधू बुधवारी झुई यावोशी सलामीच्या लढतीत भिडणार आहे.
राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता परुपल्ली कश्यप, जागतिक क्रमवारीत ३६व्या स्थानावरील सौरभ वर्मा, आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनासुद्धा पुरुष एकेरीत आव्हानात्मक लढतींना सामोरे जावे लागणार आहे.
महिला दुहेरीत राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला जपानच्या अयाने कुरिहारा आणि नारू शिनोया जोडीशी सलामीच्या लढतीत सामोरे जायचे आहे.