पी. व्ही. सिंधू, पी. सी. तुलसी, पारुपल्ली कश्यप यांनी आपापल्या लढतीत सहजपणे विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. या तिघांच्या बरोबरीने मुंबईकर तन्वी लाड, पुणेकर सायली गोखले, नागपूरच्या अरुंधती पनतावणे यांनीही पुढील फेरीत आगेकूच केली.
पी.व्ही.सिंधूने संचाली दासगुप्तावर २१-१२, २१-७ अशी मात केली तर दुसऱ्या लढतीत तिने मुद्रा धैनजेवर २१-३, २१-७ असा दणदणीत विजय मिळवला. पी.सी.तुलसीने रेश्मा कार्तिकवर २१-११, २१-१८ असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत तिने जॅकलिन रोस कुनथचा २१-७, २१-५ असा धुव्वा उडवला. सायली गोखलेने प्रियांका कुमावतचा २१-८, २१-९ असा धुव्वा उडवला तर दुसऱ्या लढतीमध्ये रुथ मिशाला २१-१९, २१-६ असे नमवले.
तन्वी लाडने अनिता ओहलानचा २१-१५, २१-१२ असा पराभव केला तर मोहिता सचदेववर २१-८, २१-८ असा सहज विजय मिळवला. साईली राणेने पहिल्या लढतीत श्रुती मुंदडावर २१-१५, २३-२५, २१-११ अशी मात केली तर दुसऱ्या लढतीत रुथविका शिवानीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने साईलीला विजयी घोषित करण्यात आले. अरुंधती पनतावणेने अदिती मुटाटकरचे आव्हान २१-१७, २१-१२ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या लढतीत तिने नेहा पंडितला २१-१६, २१-१४ असे नमवले.
पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने मनीष रावतचा २१-१०, २१-५ असा धुव्वा उडवला आणि दुसऱ्या लढतीत त्याने शुभंकर डेचा २१-१४, २१-१३ असा पराभव केला. अजय जयरामने तलार लावर २१-९, २१-१४ असे तर रोहन कॅस्टेलिनोवर २१-१२, २२-२० असा विजय मिळवला. सौरभ वर्मा, आनंद पवार, आरएमव्ही गुरुसाईदत्त, कदंबी श्रीकांत यांनीही विजयी आगेकूच केली. महिाल दुहेरीत प्रज्ञा गद्रेने सिक्की रेड्डीच्या साथीने तर प्राजक्ता सावंतने अराथी सारा सुनीलच्या साथीने खेळताना पुढील फेरीत प्रवेश मिळवला.