भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला सुधारित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जागतिक मालिका स्पर्धाच्या अंतिम टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळणार नाही. कारण जागतिक विजेत्याला या प्रतिष्ठेच्या स्पध्रेसाठी थेट प्रवेश न देण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) घेतला आहे. गतवर्षी जागतिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेन्मार्क खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे आशिया चषक स्पर्धाच्या टप्प्यांमध्ये तिला पात्रतेचा अडथळा ओलांडावा लागणार आहे.

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या नियमानुसार जागतिक विजेत्याला त्यानंतर येणाऱ्या जागतिक मालिका स्पर्धाच्या अंतिम टप्प्यासाठी थेट प्रवेश दिला जायचा. परंतु करोनाच्या साथीमुळे बॅडमिंटनचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक कोलमडले आहे. जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे जागतिक संघटनेने यंदाच्या वर्षांपुरते नियमांत बदल केले आहेत.

‘‘बँकॉकला होणाऱ्या ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक मालिका स्पर्धाच्या अंतिम टप्प्यासाठी खेळाडूंना पात्र व्हावे लागणार आहे. या स्पर्धेच्या नियम क्रमांक ८.२.३मध्ये बदल करण्यात आला आहे. फक्त जागतिक मालिका स्पर्धामधील गुण ग्रा धरले जाणार आहेत,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले आहे.

पात्रतेसाठी जागतिक मालिकेतील उर्वरित स्पर्धा

* डेन्मार्क खुली स्पर्धा (सुपर ७५०)

* आशिया चषक खुली स्पर्धा-१ (सुपर १०००)

* आशिया चषक खुली स्पर्धा-२ (सुपर १०००)