इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा

जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर कोर्टवर परतण्यासाठी उत्सुक असलेली ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि पुरुष एकेरीतील आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असणार आहे.

परंतु गतवर्षीच्या आशियाई विजेत्या सायना नेहवालने असंख्य दुखापतींमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. यंदाच्या वर्षांत भारताला एकमेव विजेतेपद सायनाने मिळवून दिले आहे. सायनाने मलेशिया मास्टर्स स्पर्धेत हे विजेतेपद मिळवले होते.

गतवर्षी डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद मिळवल्यानंतर सिंधूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याशिवाय यावर्षी सिंधूला आतापर्यंत एकाही स्पर्धेची अंतिम फेरीसुद्धा गाठता आलेली नाही. पहिल्या फेरीत सिंधूसमोर जपानच्या आया ओहरीचे आव्हान असेल. परंतु उपांत्यपूर्व फेरीत तिची जपानच्याच नाओमी ओकुहाराशी गाठ पडू शकते.

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या श्रीकांतचा पहिला सामना जपानच्या केंटा निशिमोटोविरुद्ध रंगणार आहे. श्रीकांतने या वर्षांच्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. २०१७ मध्ये इंडोनेशियाचे विजेतेपद मिळवणाऱ्या श्रीकांतव्यतिरिक्त बी साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय हेसुद्धा पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी व प्रणव चोप्रा यांच्यावर भारताची भिस्त आहे. तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि रेड्डी या अनुभवी जोडीकडे सर्वाच्या नजरा असतील. पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज आणि चिराग शेट्टी ही एकमेव जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल.

गेल्या काही महिन्यांत मी सुमार कामगिरी केली आहे. परंतु विश्रांतीदरम्यानच्या काळात मी माझ्या शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीवर मेहनत घेतली आहे. या स्पर्धेत नक्कीच उत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरेन.

– पी. व्ही. सिंधू