सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांचे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) बुधवारी सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता महासंघाचे निकष आणि नशिबाची साथ मिळाली, तरच या दोघांना ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता येईल.

काही दिवसांपूर्वीच २५ ते ३० मेदरम्यान होणारी मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे १ ते ६ जूनदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेवर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना आणि श्रीकांतचे भवितव्य अवलंबून होते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही दोघांनाही अखेरची संधी होती. अनेक देशांनी भारतीय नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातल्यामुळेसुद्धा सायना, श्रीकांत यांच्यापुढील आव्हानांत यापूर्वीच वाढ झाली होती.

‘‘आयोजकांशी केलेली चर्चा आणि स्थानिक भागातील करोनाजन्य स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी सगळेच उत्सुक होते. परंतु सिंगापूरसह संपूर्ण विश्वातील स्थिती सध्या बिकट असल्यामुळे नाइलाजास्तव ही स्पर्धा रद्द करावी लागत आहे,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले. त्याशिवाय सलग दोन पात्रता स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची शक्यता असलेल्या खेळाडूंबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असेही महासंघाने निवेदनात नमूद केले. यामध्ये त्यांची गेल्या काही स्पर्धांमधील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. त्याशिवाय काही खेळाडूंनी माघार घेतली तर काहींना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

आतापर्यंत भारतीय बॅडमिंटनपटूंपैकी पी. व्ही. सिंधू, बी. साईप्रणीत यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत, तर चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरीत ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. २३ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी महासंघ कोणता तोडगा काढणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र तूर्तास ३१ वर्षीय सायनाला २००८नंतर प्रथमच ऑलिम्पिकला मुकावे लागणार, तर २८ वर्षीय श्रीकांतला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही.