राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांच्याविरोधात न्यायालयीन लढाईमुळे मुंबईकर बॅडमिंटनपटू प्राजक्ताला सक्तीच्या एकाकीपणाला सामोरे जावे लागत आहे. खेळण्यासाठी साथीदारच नाही अशी प्राजक्ताची अवस्था आहे. मात्र ज्वाला गट्टाच्या रूपाने प्राजक्ता सावंतला आशेचा किरण गवसला आहे. दोन स्पर्धासाठी तरी प्राजक्तासह खेळण्यास उत्सुक असल्याचे ज्वालाने सांगितले.
भारताची दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू ज्वाला गट्टाने लंडन ऑलिम्पिकनंतर विश्रांतीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ज्वालाची नियमित साथीदार अश्विनी पोनप्पाने महाराष्ट्राच्या प्रज्ञा गद्रेसह खेळण्याचा निर्णय घेतला. ज्वालाने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. अश्विनी प्रज्ञाच्या साथीने खेळत असल्याने एकाकी पडलेल्या प्राजक्तासह खेळायला आवडेल, असे ज्वालाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे ज्वाला गट्टा आणि गोपीचंद यांच्यातही मतभेद झाले होते.
जर्मन ग्रां. प्रि. गोल्ड आणि ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत मी प्राजक्तासह खेळू शकेन. या दोन स्पर्धानंतर मात्र मी पुन्हा अश्विनीच्या साथीने खेळेन. भारतीय संघात दोघींची निवड झाल्यानंतरच मी प्राजक्तासह खेळू शकते. यासंदर्भात विनंतीचा ई-मेल भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश गुप्ता यांना पाठवावा, असे मी प्राजक्ताला सांगितले होते.
‘प्राजक्ताला साथीदार मिळणे आवश्यक आहे. अश्विनी आणि प्रज्ञा मार्चपर्यंत एकत्र खेळणार आहेत. माझ्या पुनरागमनासाठी त्यांची जोडी मार्चआधीच तोडणे योग्य नाही. दुहेरीत या दोघींनंतर प्राजक्ता सर्वोत्तम खेळाडू आहे. तिच्याव्यतिरिक्त अन्य काही खेळाडू आहेत पण मला दुहेरीवरच लक्ष केंद्रित असणाऱ्या खेळाडूबरोबर खेळायला आवडेल. म्हणून हा निर्णय घेतला आहे’, असे ज्वालाने सांगितले. दरम्यान, भारतीय संघात निवड होऊनही प्राजक्ता अद्याप हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय शिबिरात सहभागी झालेली नाही.