News Flash

ज्येष्ठ क्रिकेटपटूचे निधन; सर व्हिव रिचर्ड्स यांनी वाहिली श्रद्धांजली

भारतीय भूमीत भारताविरूद्धच ठोकली होती सलग चार शतकं

ज्येष्ठ क्रिकेटपटूचे निधन; सर व्हिव रिचर्ड्स यांनी वाहिली श्रद्धांजली

भारतीय गोलंदाजांना क्रिकेटच्या मैदानावर सळो की पळो करून सोडणाऱ्या ज्येष्ठ क्रिकेटपटूचे निधन झाले. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता अशा तीन शहरात सलग चार शतकं ठोकणारे कॅरेबियन क्रिकेटचे पितामह एव्हर्टन वीक्स यांनी ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दीर्घकाळ आजारी होते. त्यानंतर बुधवारी बार्बाडोस येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

वीक्स यांनी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. त्यांनी एकूण ४८ कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे त्यांनी ५८ च्या सरासरीने ४,४५५ धावादेखील केल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी १५ शतके ठोकली. सलग पाच सामन्यात शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. पदार्पणाच्या वर्षातच त्यांनी हा पराक्रम केला होता. वीक्स हे तीन W पैकी एक होते. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या उन्नतीसाठी क्लाईड वॉलकॉट, फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स या तीन W ने मोठे योगदान दिले.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी वीक्स यांना श्रद्धांजली वाहिली. “सर एव्हर्टन वीक्स हे आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ते कॅरेबियन क्रिकेटमधील एक आदर्श क्रिकेटपटू होते”, अशा शब्दात रिचर्ड्स यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

वीक्स यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ICC ट्विटर, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड, समालोचक हर्षा भोगले, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे, बीशन सिंग बेदी यांनीही सर एव्हर्टन वीक्स यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 8:31 pm

Web Title: sir vivian richards pays homage to west indies great late everton weekes cricket world mourns vjb 91
Next Stories
1 जेव्हा युसून खान प्रशिक्षकांच्या गळ्यावर सुरा ठेवतो…वाचा धक्कादायक प्रसंग
2 ‘शतकातील मौल्यवान कसोटीपटू’चं सौराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून कौतुक
3 २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स?? कुमार संगकाराची ५ तास कसून चौकशी
Just Now!
X