प्रत्येक माणूस हा चांगल्या-वाईट अनुभवांमधून बरेच काही शिकत असतो. त्याचप्रकारे मलाही परिस्थितीने बरेच काही शिकवले आहे. वादग्रस्त प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही काळ क्रिकेट थांबवावे लागल्यानंतर माझ्या मानसिकतेतही बराच फरक पडला असून त्याचा फायदा मला ‘आयपीएल’मध्ये होत असल्याचे मत भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने व्यक्त केले.

दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात हार्दिकने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही काळासाठी निलंबित केले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पंडय़ाने पुनरागमन करीत दमदार कामगिरी बजावली होती. त्याशिवाय सध्या मुंबईकडून खेळताना त्याने १९१ च्या तुफानी सरासरीने १८६ धावा फटकावल्या आहेत.

‘‘बंदीच्या काळात मला माझ्या तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला. हा वेळ माझ्या मानसिकतेत बदल करणारा ठरला असून आता मी अधिक चांगल्या पद्धतीने खेळत आहे. मी परिस्थितीनुसार खेळ करण्यावर अधिक भर देत आहे.

गेल्या चार वर्षांपासून माझ्यावर सोपवलेल्या भूमिकेनुसारच खेळण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही खेळात चलाख असाल आणि परिस्थितीचे आकलन झटकन करून त्यानुसार बदल करता  येत असतील तर तुम्हाला अधिक प्रमाणात सामन्यांचे सकारात्मक निकाल मिळवता येतात,’’ असेही पंडय़ाने नमूद केले.