भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी रवी शास्त्रीसह सहा  नावांची छाननी करण्यात आली.

सहा उमेदवारांमध्ये न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग या पाच जणांचा समावेश आहे. तर शास्त्री हे सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना निवडप्रक्रियेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.

कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती या आठवडय़ाच्या अखेरीस अथवा पुढील आठवडय़ापर्यंत भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची शक्यता आहे. कपिल यांच्या समितीत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

‘‘भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सहा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून क्रिकेट सल्लागार समिती या सहापैकीच एकाची निवड करेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले.

शास्त्री यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात सुरू होणाऱ्या मालिकेद्वारे नवा प्रशिक्षक सूत्रे हाती घेणार आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शास्त्री यांच्याकडेच पुन्हा प्रशिक्षकपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.

हेसन आणि मूडी यांनी सर्वप्रथम भारताच्या प्रशिक्षकपदासाठी पसंती दर्शवली होती. हेसन यांनी नुकताच ‘आयपीएल’मधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपद सोडले. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडने २०१५च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. मूडी यांनी श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले असून ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदराबादलाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

परंतु आता सिमॉन्स यांचेही नाव या यादीत जोडले गेले आहे. सिमॉन्स हे २०१७पासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. मात्र विश्वचषकानंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

रॉबिन यांनी २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. तर राजूपत हे त्याच विश्वविजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्याशिवाय त्यांनी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.