उत्तेजक सेवनाबद्दल चीनचेही काही जलतरणपटू दोषी आढळले आहेत, मात्र त्यांच्याबाबत गुप्तता पाळण्यात येत असल्यामुळे सर्वाचे लक्ष जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) अहवालाकडे लागले आहे.
रशियन खेळाडूंसह काही जलतरणपटू उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिल्यानंतर ‘वाडा’ने याबाबत सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील काही संघटकांनी प्रसारमाध्यमांकडे संपर्क साधला होता व काही जलतरणपटू उत्तेजक चाचणीत दोषी असल्याचे वृत्त दिले होते. ऑलिम्पिकपूर्वी जर हे वृत्त प्रसिद्ध झाले तर त्याचा अनिष्ट परिणाम चीनच्या तयारीवर होईल या हेतूने ही माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. वृत्तपत्रांनी ‘वाडा’ संस्थेकडे ही माहिती पाठवावी, अशी विनंती या संघटकांनी केली आहे. त्यामुळे त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ‘वाडा’ने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक जलतरण प्रशिक्षक संघटना व अमेरिकन जलतरण प्रशिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चीनच्या खेळाडूंची त्वरित चाचणी घेतली जावी असा आग्रह धरला आहे. १९९० मध्ये चीनचे चाळीसहून अधिक जलतरणपटू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. त्यास जबाबदार असलेल्या झोऊ मिंग या प्रशिक्षकांवर तहहयात बंदी घालण्यात आली होती.
चीनने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील जलतरणात दुसरे स्थान घेतले होते. चीनचे काही खेळाडू ऑस्ट्रेलियात प्रशिक्षण घेत असतात. ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिक विजेता जलतरणपटू ग्रँट हॅकेटने चीनच्या येथील काही खेळाडूंची दीड वर्षांत एकदा उत्तेजक चाचणी घेण्यात आल्याचे सांगितले.
रशियातील वैद्यकीयतज्ज्ञ सर्जी पोर्तुगालोव्हने रशियाच्या अ‍ॅथलेटिक्स संघातील काही धावपटूंना उत्तेजक घेण्यासाठी प्रेरित केले होते व रशियन अ‍ॅथलेट उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याच्या घटनेला तोच जबाबदार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले आहे.